दिल्लीत धो-धो पाऊस, अनेक भाग जलमय; 40 विमाने वळवली

दिल्ली-एनसीआरमध्ये आज सकाळपासून अक्षरशः धो-धो पाऊस पडला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळामुळे अनेक भाग जलमय झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या आणि घरांचे छप्पर उडण्याच्या घटना घडल्या.

40 विमाने वळवली

खराब हवामानामुळे विमानांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला. वादळी वारे, गारांसह आलेल्या मुसळधार पावसामुळे 40 हून अधिक विमानांचे मार्ग वळवण्यात आले तर जवळपास 100 उड्डाणे उशिराने झाली.

दिल्ली-एनसीआर पाण्याखाली गेले. त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी झाली. दिल्लीतील छावाला येथे एका घराचे छत कोसळल्याने चार जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या घटनेत आईसह तीन मुलांना झोपेतच काळाने गाठले.