जामिया हिंसाचाराची चौकशी क्राईम ब्रँचकडे – दिल्ली पोलीस

नागरिकता सुधारणा कायद्याला देशातील काही भागातून तीव्र विरोध होत आहे. राजधानी दिल्लीत जामिया विद्यापीठाबाहेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला तीव्र स्वरुप आले आहे. या हिंसाचारात विद्यार्थ्यांनी चार बसेसला आग लावली. तसेच पोलिसांनाही मारहाण केली. या घटनेची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे. जामिया हिंसाचाराची चौकशी क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात येणार असल्याचे दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम.एस रंधावा यांनी सांगितले.

या घटनेत अफवा पसरल्याने हिंसाचार उफाळल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्राईम ब्रँच या घटनेच्या सर्व पैलूंची बारकाईने चौकशी करेल, असे रंधावा यांनी सांगितले. तसेच या हिंसाचारादरम्यान पोलिसांकडून गोळीबार झाला नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे आंदोलकांना पांगवण्यासाठी आणि त्यांचा पाठलाग करताना पोलिसांना कँपसमध्ये घुसावे लागल्याचेही रंधावा यांनी स्पष्ट केले. या घटनेत जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. आंदोलनकांनी चार बसेसला आग लावली आणि पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यात 30 पोलीस जखमी झाले असून दोघांना फ्रॅक्चर झाल्याचेही त्यांनी सांगितले. एका बसला लावलेली आग विझवण्यात पोलीसांना यश आल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेत अफवा पसरल्याने हिंसाचार उफाळल्याचे दिसत आहे. त्यामुळे अफवा पसरवू नका, कोणी अफवा पसरवत असल्याचे आढळल्यास पोलिसांना त्याची माहिती द्या, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही चिथावणीला बळी पडू नये, असे आवाहनही रंधावा यांनी केले आहे.  या हिंसाचारात स्थानिकांचाही सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे. या हिंसाचारात दोषी असलेल्यांवरच कारवाई करण्यात येईल,असेही रंधावा यांनी स्पष्ट केले.

जामिया मिलिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नाराजी दर्शवली आहे. तसेच विद्यार्थी आहेत म्हणून त्यांना हिंसेचा अधिकार नाही असेही न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार असून हिंसेच्या घटना अशाच सुरू राहिल्यास सुनावणी करणार नाही, अशी तंबी न्यायालयाने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या