प्रायव्हेट ट्रेन ‘तेजस’ला 70 लाखांचा नफा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या पहिल्यावहिल्या खासगी ट्रेन ‘तेजस’ला पहिल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये 70 लाखांचा नफा झाला आहे. 5 ऑक्टोबरला आयआरसीटीसीने दिल्ली ते लखनौ मार्गावर पहिली खासगी ट्रेन तेजसची सुरुवात केली होती. तिच्या तिकीट विक्रीतून ऑक्टोबर महिन्यात 3.70 कोटींचा महसूल मिळाला आहे.

रेल्वेची खानपान व्यवस्था सांभाळणाऱया आयआरसीटीसी कंपनीमार्फत प्रथमच लखनौ-दिल्ली तेजस एक्स्प्रेससह 150 ट्रेन खासगी पद्धतीने चालविण्यासह 50 रेल्वे स्थानकांचा विकास जागतिक दर्जाचा करण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते. या तेजस ट्रेनला 5 ऑक्टोबरला सुरुवात झाल्यापासून सरासरी 80 ते 85 टक्के भारमान लाभले असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

5 ते 28 ऑक्टोबरदरम्यान 21 दिवसांत (ही ट्रेन आठवडय़ातून सहा वेळा धावते) या ट्रेनवर आयआरसीटीसीने सुमारे तीन कोटी रुपये खर्च केले. रेल्वेने दर दिवशी साधारण 14 लाख रुपयांची सबसिडी या आलिशान ट्रेनच्या ऑपरेशनसाठी दिली. प्रवासी तिकिटांच्या विक्रीतून दर दिवसाला त्याद्वारे 17.50 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

‘स्पेशल टास्क फोर्स’च नेमला

रेल्वेचा हा खासगी ट्रेन चालविण्याचा पहिलाच प्रयत्न त्यांचीच उपकंपनी असलेल्या आयआरसीटीसीमार्फत चांगलाच फळला आहे. आयआरसीटीसीने या मेट्रोप्रमाणे दरवाजे असलेल्या ‘तेजस ट्रेन’च्या प्रवाशांना संमिश्र जेवणाचा मेनू ठेवला होता. शिवाय गाडीला उशीर झाला तर 25 लाखांपर्यंत नुकसानभरपाई देण्याची तयारी ठेवली होती. आता रेल्वे मंत्रालयाने गेल्याच आठवडय़ात अशा प्रकारे प्रायव्हेट ट्रेन चालविण्यासाठी मार्ग निवडण्यासाठी तसेच खासगी सहभागातून विकास करण्यासाठी स्थानके निवडण्यासाठी सचिवांच्या गटाचा ‘स्पेशल टास्क फोर्स’च नेमला आहे.