
राजधानी दिल्लीत मंगळवारी बदललेल्या हवामानामुळे जोरदार वारे आणि पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे तापमानात मोठी घट होऊन दिल्लीकरांना हुडहुडी भरली आहे. पश्चिम विक्षोभामुळे झालेल्या या पावसामुळे दिल्ली-एनसीआरच्या तापमानात 6 ते 7 अंश सेल्सिअसची घसरण नोंदवण्यात आली. मंगळवारी दिल्लीत 4.2 मिमी पावसाची नोंद झाली असून नोएडा आणि रेवाडी-नारनौल परिसरात गारपीटही झाली. मात्र, या पावसामुळे हवेत गारठा वाढला असला तरी प्रदूषित हवेच्या स्थितीत विशेष सुधारणा झालेली नाही. दिल्लीतील हवेची गुणवत्ता अजूनही विषारी आणि ‘खराब’ श्रेणीतच कायम आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या आकडेवारीनुसार, बुधवारी सकाळी 7 वाजता दिल्लीचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 273 नोंदवण्यात आला, जो ‘खराब’ श्रेणीत येतो. मंगळवारी हा निर्देशांक 336 होता, तर सोमवारी तो 241 इतका नोंदवला गेला होता. दिल्लीप्रमाणेच शेजारील नोएडा आणि गुरुग्राममध्येही प्रदूषणाची स्थिती चिंताजनक आहे. नोएडामध्ये सोमवारी 219 असलेला AQI मंगळवारी 331 वर पोहोचला, तर गुरुग्राममध्ये सोमवारी 276 वरून मंगळवारी 306 पर्यंत वाढ होऊन हवेची गुणवत्ता खालावली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 1 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा पावसाची शक्यता असून पुढील चार दिवस हवामान अशाच प्रकारे राहील, मात्र पावसाची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.





























































