
दिल्लीतील नऊ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे ईमेल मिळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी 8.30 ते 9 च्या सुमारास हे धमकीचे मेल शाळांना मिळाले. लॉरेटो कॉन्व्हेंट, केंब्रिज स्कूल आणि बाल भारती यांसारख्या प्रमुख शाळांचा यात समावेश आहे. धमकीची माहिती मिळताच दिल्ली पोलीस, अग्निशमन दल आणि बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढून संपूर्ण परिसराची कसून झडती घेण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार,या शाळांना मिळालेल्या धमकीच्या ईमेलमध्ये द्वेषपूर्ण संदेश दिले होते. “दिल्ली खलिस्तान बनेल” आणि “अफजल गुरूच्या स्मरणार्थ” यांसारख्या घोषणांचा उल्लेख करत, 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.11 वाजता शाळांमध्ये स्फोट घडवून आणण्याचा दावा करण्यात आला आहे. या ईमेलच्या शेवटी ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’ असे नाव लिहिण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी या मेलची गंभीर दखल घेतली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सायबर सेल आणि इतर यंत्रणांकडून केला जात आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 या काळात शाळांना अशा प्रकारे धमक्या मिळण्याचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी 28 आणि 29 जानेवारीला सरदार पटेल विद्यालय आणि डॉन बॉस्कोसह पाच शाळांना लक्ष्य करण्यात आले होते. तसेच 7 फेब्रुवारीला 50 हून अधिक शाळांना अशाच प्रकारचे ईमेल पाठवण्यात आले होते. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
धमकी मिळालेल्या सर्व शाळांमध्ये सुरक्षा तपासणी पूर्ण करण्यात आली असून कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. पोलीस आता या ईमेलचा आयपी ॲड्रेस आणि कॉल करणाऱ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी आणि पालकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता घाबरून जाऊ नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

























































