दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पीएमसी बँक ठेवीदारांच्या आंदोलनास मनाई

308

सीएए कायद्यावरून दिल्लीमध्ये उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणत्याही कारणास्तव निदर्शने करण्यास मनाई करण्यात आली आहे. पंजाब ऍण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) ठेवीदारांना सोमवारी याचा प्रत्यय आला. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) रिझर्व्ह बँकेबाहेर निदर्शने करण्यास त्यांना मनाई करण्यात आली.

हजारो कोटींच्या घोटाळय़ामुळे पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांमुळे बँकेचे लाखो ठेवीदार हैराण झाले आहेत. आपल्या ठेवींना संरक्षण मिळावे यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्याच मागणीसाठी आज बीकेसीत निदर्शने केली जाणार होती. शेकडो ठेवीदार त्यात सहभागी होणार होते. परंतु पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे आणि अतिरिक्त आयुक्त मनोज शर्मा यांनी परवानगी नाकारल्याचे एक ठेवीदार विशाल वसिष्ठ यांनी सांगितले.

दिल्लीतील हिंसाराचारामुळे मुंबईत जमावबंदी लागू असून कोणत्याही आंदोलनाला परवानगी दिली जाऊ शकत नाही असे पोलिसांनी सांगितल्याची माहिती ठेवीदारांनी दिली. आंदोलनावेळी काही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली जाईल आणि घडलाच तर त्याची सर्वस्वी जबाबदारी आम्ही घेऊ अशी हमी देऊनही पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे ठेवीदारांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या