Delhi Violence – मे महिन्यात लग्न होतं, पोलिसांच्या गोळीबारात तरुणाच्या गुप्तांगाला गंभीर इजा

1269

Delhi Violence CAA Protest, Updates ईशान्य दिल्लीमध्ये भडकलेल्या हिंसाचारात 39 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण गंभीररित्या जखमी झाले असून यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. अनेक जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम त्यांचे कुटुंबीय अथकपणे करीत आहेत. अल हिंद नावाच्या रुग्णालयात 500 जण भरती करण्यात आले आहेत. हे सगळे जण गंभीररित्या जखमी असल्याचं सांगण्यात आलं आहे. यातल्या एका रुग्णाचे पोलिसांच्या गोळीबारात गुप्तांग फाटलं आहे.

अल हिंद रुग्णालयाच्या डॉक्टरांनी माहिती देताना सांगितले की मुस्तफाबादचा रहिवासी असलेला हा तरूण गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आला होता. मोहम्मद इम्रान असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्या गुप्तांगाला पोलिसांच्या गोळीबारात गंभीर इजा झाली होती. इम्रानची प्रकृती सुधारते आहे मात्र चिंतेची बाब ही आहे की त्याचं लग्न मे महिन्यात होणार आहे.

इम्रानची प्रकृती सुधारत असल्याने त्याला एलएनजेपी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. फर्स्ट पोस्टया संकेतस्थळाशी बोलताना इम्रानने म्हटले की आपण रस्त्यावरच नाही तर घरामध्येही असुरक्षित आहोत. मी घरातून संध्याकाळी 5 वाजता बाहेर आलो. काही लोकं आरडाओरडा करत होती, ते काय गोंधळ घालतायत हे पाहण्यासाठी बाहेर आलो होतो. काय चाललंय हे पाहात असताना मला कमरेच्या खाली अचानक वेदना सुरू झाल्या आणि मला रक्त वाहात असल्याचं दिसलं. घरी जाऊन पाहिलं तर माझ्या गुप्तांगाला इजा झाली होती, आणि रक्त वाहात होतं. मला इतक्या वेदना होत होत्या की मी मरतोय की काय असं वाटत होतं.

4 भाऊ आणि 3 बहिणींच्या कुटुंबामध्ये इम्रान एकटा कमावणारा आहे. या दुर्घटनेमुळे काही महिने तो कामावर जाऊ शकणार नाहीये. इम्रानच्या पाठीवर आणि डोक्यावरही गंभीर जखमा झाल्या आहेत. इम्रानच्या वडिलांनी म्हटलंय की त्याची जखम ही गंभीर होती , रक्म मोठ्या प्रमाणावर वाहात होतं. आम्ही त्याला अर्बन हॉस्पीटलमध्ये नेलं मात्र तिथे दाखल करून घेण्यास मनाई करण्यात आली. ज्यामुळे आम्ही त्याला एलएनजेपी रुग्णालयात नेलं.

आपली प्रतिक्रिया द्या