हिंसाचार थांबला, आता दिल्लीत फिरतंय अफवांचे भूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
delhi-police

दिल्लीतील हिंसाचार आता थांबला असून सर्व भागात शांतता असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी अफवेचे भूत दिल्लीकरांना छळत आहे. रविवारी दिल्लीकरांची सकाळ नेहमीप्रमाणे झाले. दैनंदिन व्यवहार देखील सुरळीत सुरू होते. मात्र सायंकाळी एका अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि दिल्लीतील अनेक भागात धावपळ सुरू झाली. काही भागात चेंगराचेंगरी झाल्याचे ही वृत्त आहे.

याच दरम्यान शिवणकाम करणाऱ्य़ा एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दिल्लीच्या बटला हाऊस येथे रविवारी चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त आहे. हबीबुल्लाह हा 32 वर्षांचा व्यक्ती बटला हाऊस जवळ बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्याला मृत घोषित करण्यात आले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. शरीरावर एकही जखम, किंवा खूण आढळली नसल्याने व्यक्तीच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. त्यामुळेच चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याचा केवळ संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पश्चिम दिल्लीच्या ख्याला भागात पोलिसांनी एका जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या लोकांची धावपळ सुरू झाली. आणि तिथून हिंसाचार सुरू झाल्याची अफवा पसरली असे एका हिंदी वृत्तवाहिनीने सांगितले आहे. दरम्यान, अफवा पसरल्यानंतर दिल्लीचे सात मेट्रो स्टेशन तातडीने बंद करण्यात आले. अफवेनुसार राजौरी, ख्याला या भागात हिंसाचार सुरू असल्याचे म्हटले जात होते. मात्र प्रत्यक्षात कुठेही हिंसाचाराची घटना झालेली नव्हती. काहीवेळा नंतर पुन्हा एकदा दिल्ली पूर्व स्थितीवर आली.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी नगरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणतीही माहिती मिळाल्यास शहानिशा केल्याशिवाय ती दुसऱ्यांपर्यंत फॉरवर्ड करू नये. काही माहिती मिळाल्यास पोलिसांना तात़डीने त्याची माहिती देणे असेही आवाहन करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांची शहरात विविध ठिकाणी गस्त सुरू असून संवेदनशील भागावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. दिल्लीत आता संपूर्ण शांतता आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली हिंसाचारात 42 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये आयबीचे अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या करण्यात आली तर एका हेडकॉस्टेबलचा मृत्यू देखील झाला होता.