भुयारी मेट्रो मार्गिकेवर प्रत्येक तीन-चार स्थानकांदरम्यान वैद्यकीय युनिट्स स्थापण्याची मागणी

भुयारी मेट्रो मार्गिकेवर वैद्यकीय सुविधांची वानवा असून, आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचार मिळणे मुश्किल बनू शकते. या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या प्रत्येक तीन ते चार स्थानकांदरम्यान वैद्यकीय युनिट्स स्थापन करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेचे कुलाबा विधानसभा क्षेत्राचे उपविभागप्रमुख कृष्णा पवळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे पत्राद्वारे केली आहे.

आरे जेव्हीएलआर ते कफ परेडदरम्यान भुयारी मेट्रोची सेवा आहे. या मार्गिकेवरील तासभराच्या प्रवासादरम्यान आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रवाशांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून भुयारी मेट्रोच्या मार्गिकेवरील प्रत्येक तीन ते चार स्थानकांदरम्यान डॉक्टरांसह सुसज्ज वैद्यकीय युनिट्सची स्थापना करावी, जेणेकरून प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला, एखादी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवली अथवा अपघात घडल्यास ’गोल्डन अवर’मध्ये तत्काळ उपचार मिळवणे शक्य होईल. भुयारी मेट्रोच्या वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करण्याची मागणी कृष्णा पवळे यांनी पत्राद्वारे केली आहे.