लातूरमध्ये कोर्ट आदेशाचा अवमान, अनधिकृत होर्डिंग्जप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

शहरांचे विद्रुपीकरण करणारे अनधिकृत होर्डिंग्ज रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. होर्डिंग्जच्या प्रकरणातील एका याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. मनोज कोंडेकर यांनी यासंदर्भात पत्र लिहिले आहे. लातूर जिह्यातील अधिकारी हायकोर्टाच्या आदेशाचा जाणूनबुजून अवमान करीत असल्याचा दावा पत्रात केला आहे.

उच्च न्यायालयाच्या मनाई आदेशानंतरही मुंबई-ठाण्यासह इतर शहरांत अनधिकृतपणे बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावले जात आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानंतरही लातूर जिह्यातील अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग्ज हटवण्याकामी लातूरचे जिल्हाधिकारी, महापालिकांचे आयुक्त तसेच इतर अधिकारी सपशेल अपयशी ठरले आहेत. ते जाणूनबुजून न्यायालयीन आदेशाचा अवमान करीत असून गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे होर्डिंग्ज कोसळून जीवितहानी घडण्याची भीती आहे. हा धोका निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, संबंधित गुह्यात शिक्षा व दंडाची रक्कम वाढवण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.