ऐन सणासुदीत नगर शहरात भेसळयुक्त वनस्पती तुपावर अन्न व प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथील आरएनए मिल्क ऍण्ड डेअरी प्रोडक्ट कंपनीचे तीन लाख 61 हजार 990 रुपयांचे व गुजरातमधील आबाद कंपनीचे पाच लाख 90 हजारांचे वनस्पती तूप भेसळयुक्त आढळून आले आहे. या कंपन्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नोटीस देण्यात आली आहे.
15 दिवसांपूर्वी केडगाव उपनगरातील गुरुदत्त मार्केट व दाळमंडई येथील ‘कटारिया ट्रेडर्स’ यांच्याकडून काही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. आरएनए मिल्कचे 35 बॉक्स वनस्पती तुपाचे जप्त करण्यात आले होते, तर आबाद कंपनीचे 55 बॉक्स जप्त करण्यात आले होते. या तुपाचे नमुने पुण्यातील एका प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. या प्रयोगशाळेचा अहवाल आला असून, दोन्ही तुपात भेसळ आढळून आली आहे, अशी माहिती नगर येथील अन्नसुरक्षा अधिकारी यांनी दिली.
किरकोळ दुकानात वितरित होण्यापूर्वीच होलसेल एजन्सीमधून माल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये कंपनी इतर तुपाच्या तुलनेत अतिशय कमी दरात तुपाची विक्री करीत होती. यातून संशय निर्माण झाला होता. ही कारवाई दूध आणि दुग्धजन्य भेसळ समितीचे अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, डेअरी डिओ गिरीश सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, सहायक आयुक्त डॉ. बी. डी. मोरे यांनी केली.