
धक्कादायक, दुःखद
‘अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती,’ अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
वेदनादायी वृत्त
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहप्रवाशांच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. या दुःखद क्षणी मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत आहे. पवार पुटुंबीय आणि नातेवाईकांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो, अशी भावना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. राहुल गांधी एक्सवर ही पोस्ट केली आहे.
दिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवासा वाटणारा नेता गेला
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. एक दिलखुलास, रोखठोक आणि कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता गेला. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातला आजचा काळा दिवस आहे. दादांशिवाय राज्याचे राजकारण, समाजकारण बेचव आणि अळणी होईल, अशा शब्दांत संजय राऊत यांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहावी लागेल, असे मनातही आले नव्हते. दादांचे बोलणे, कामाची पद्धत, प्रशासनावरील त्यांची पकड या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. बारामती आणि दादांचे एक नाते होते. त्याच बारामतीत त्यांना मृत्यू यावा हा एक विचित्र योगायोग आहे, अशी भावना संजय राऊत यांनी व्यक्त केली.
उमदा नेता
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फायलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की पुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱयांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे, अशा शोकभावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्टय़ दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की, असे राज ठाकरे म्हणाले.
शब्दच नाहीत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे, शब्दच नाहीत… अशा भावना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल्या. अजित पवार यांच्यासोबत सरकारमध्ये तसेच विरोधी पक्षात काम करण्याचा अनुभव आठवला. अजितदादांसोबत पहिल्या सरकारमध्ये तसेच काही काळ विरोधी पक्षात काम करण्याचा अनुभव आठवला. विधिमंडळाच्या कारभारावर असलेली त्यांची रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव अनेकांना भावायचा, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी अजितदादांना आणि दुर्घटनेतील त्यांच्या सहकाऱयांना विनम्र श्रद्धांजली वाहिली.
उद्ध्वस्त… सुप्रिया सुळे गहिवरल्या
अजित पवार यांच्या निधनाबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून भावना व्यक्त केली. त्यांनी ‘उद्ध्वस्त’ हा एकच शब्द स्टेटसला ठेवला. अजित पवार यांचे जाणे हा पवार पुटुंबीयांवर किती मोठा आघात आहे हेच त्यातून प्रतीत होत होते. अजित पवार हे सुप्रिया सुळे यांचे चुलत भाऊ होते. वयाने मोठे असलेले अजितदादा राजकारणातही सुप्रिया सुळे यांना ज्येष्ठ होते. सुप्रिया सुळे राजकारणात आल्यानंतर शरद पवारांचे वारस म्हणून अजितदादांऐवजी त्यांचे नाव घेतले जाऊ लागले होते. मात्र, त्यामुळे त्यांच्या संबंधात कधीही दुरावा आला नाही. राजकीय मार्ग वेगळे झाल्यानंतरही सुप्रिया सुळे यांनी कधी दादांवर टीका केली नाही. नात्यात त्यांनी कधी कटुता येऊ दिली नाही. त्यामुळेच अजितदादांच्या निधनानंतर सगळे काही संपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
एनडीएची हानी
अजित पवार यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित केले होते. जेव्हा जेव्हा त्यांची भेट व्हायची, तेव्हा ते महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करायचे. त्यांचे निधन ही एनडीए पुटुंबासह माझी वैयक्तिक हानी आहे, असे पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.
अकाली, अनैसर्गिक
अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी आहे. दीर्घ आणि उज्ज्वल राजकीय कारकीर्द समोर असलेल्या एका नेत्याचे अकाली निधन वेदनादायी आहे, अशी भावना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली.
माझे वडील गेल्यानंतर अजितदादांनी मला ती उणीव कधी भासू दिली नाही. अजितदादांच्या जाण्याने आज मी पुन्हा पोरका झालो. महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणारा आणि भल्या पहाटे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी झपाटून कामाला लागणारा नेता आता पुन्हा होणे नाही. वक्तशीरपणा, नियोजन आणि शिस्त हे त्यांचे स्वभाववैशिष्टय़.
अजितदादांचे असे अकाली जाणे वेदनादायी तसेच चटका लावणारे आहे. अजितदादांचा राजकीय अभ्यास कमालीचा दांडगा होता. त्याचबरोबर गावागावातील कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा संपर्पही वाखाणण्याजोगा होता. स्पष्टवक्ता, निर्भीड, कर्तव्यपरायण अशी कितीही बिरूदे लावली तरी कमीच पडतील.
अजितदादा आपल्यात नाहीत ही गोष्टच मनाला पटत नाही. अजितदादांच्या जाण्याने राज्याची अपरिमित हानी झाली आहे. हे नुकसान कधीही भरून निघणारे नाही. अजितदादांसारखा नेता आता होणे नाही. संपूर्ण राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
‘अजितपर्व’ हरपले
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते ‘अजितपर्व’ हरपले आहे. कार्यतत्पर आणि शब्दाला जागणाऱया लोकनेत्याचे जाणे ही राज्याची कधीही न भरून निघणारी हानी आहे, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला. त्यांचे आणि माझे नाते राजकीय सहकाऱयांपलीकडील होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांचा स्पष्टवक्ता स्वभाव आणि ‘कामाचं बोला’ म्हणण्याची आग्रही पद्धत प्रशासनाला शिस्त लावणारी होती, असे ते म्हणाले.
रनवे दिसतोय म्हणताच लँडिंगला ग्रीन सिग्नल मिळाला, पण…
विमानाने सकाळी 8.18 वाजता बारामती एटीसीशी संपर्क साधला. विमान बारामतीपासून 30 नॉटिकल मैलावर आहे, असे सांगितले. त्यानंतर विमानाला पुणे अप्रोचमधून रिलीज करण्यात आले. वाऱयाचा वेग फार नाहीय आणि दृश्यमानता साधारण 3 हजार मीटर आहे, अशी कल्पना देण्यात आली. त्यानंतर विमान रनवे 11 वर उतरण्यासाठी सज्ज झाले. मात्र क्रूने रनवे दिसत नसल्याचे सांगितले. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात ‘गो-अराऊंड’चा पर्याय निवडला गेला. नंतर विमानाची स्थिती पुन्हा विचारण्यात आली तेव्हा पुन्हा लँडिंगसाठी अप्रोच घेत असल्याचे सांगण्यात आले. अजून रनवे दिसत नाही. रनवे दिसताच कळवू असेही क्रूने सांगितले. काही सेपंदांनंतर क्रूने रनवे दिसू लागल्याची माहिती दिली. त्यानंतर 8.43 वाजता विमानाला रनवे 11 वर उतरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र क्रूकडून लँडिंग क्लीअरन्सबाबत कोणताही प्रतिसाद आला नाही. दुसऱयाच मिनिटाला विमानतळापासून जवळच आगीच्या ज्वाळा उठल्याचे दिसले, असे एटीसीने सांगितले.






























































