बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी, कंत्राटदाराकडून दीड लाख घेताना उपअभियंता ट्रॅप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थकीत बिल मंजूर करून देण्यासाठी बांधकाम कंत्राटदाराकडे दोन लाखांची मागणी करून त्यापैकी दीड लाख रुपये घेताना म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाचा उपअभियंता ट्रॅप झाला. आशीष भुरे असे त्यांचे नाव आहे.

जगदीश (नाव बदललेले) हे बांधकाम कंत्राटदार आहेत. खासदार निधीतून त्यांनी कुर्ला, वाकोला, भारतनगर परिसरात लादी बसविणे, गटार लाइन व इतर डागडुजीची कामे केली आहेत. या कामांच्या बिलाची रक्कम मंजुरीकरिता जगदीश यांनी वांद्रे येथील म्हाडा कार्यालयातील झोपडपट्टी सुधार मंडळात सादर केली होती.

या प्रलंबित बिलांच्या मंजुरीसाठी जगदीश यांनी 19 ते 21 डिसेंबर या कालावधीत आशीष भुरे यांची भेट घेतली. तेव्हा बिल मंजूर करण्यासाठी भुरे यांनी दोन लाखांची मागणी केली. जगदीश यांना लाच द्यायची नसल्यामुळे त्यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे भुरे यांची तक्रार दिली. दरम्यान, भुरे यांनी बिल मंजुरीपूर्वी दीड लाख व मंजूर झाल्यानंतर 50 हजार देण्यास जगदीश यांना सांगितले होते. हे समजताच अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने सापळा रचून आज भुरे यांना दीड लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.