शिवसेनेसोबत युती राहिलीच पाहिजे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nitin-gadkari
नितीन गडकरी

सामना प्रतिनिधी । मुंबई 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेना-भाजप युती घडवली होती. ही युती राहिलीच पाहिजे, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. लग्न झाल्यावर नवरा-बायकोत लहान लहान वाद होतच असतात. कधी कधी ‘तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशीही परिस्थिती येते, अशी टिप्पणीही त्यांनी युतीबाबत केली.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नितीन गडकरी यांनी शिवसेना-भाजप युती, स्वतंत्र विदर्भाची मागणी, पालघर, गोंदिया-भंडारा  पोटनिवडणुकीत बिघडलेली ईव्हीएम मशीन, साम-दाम दंड-भेद या मुख्यमंत्र्यांच्या विधानावर सविस्तर भाष्य केले. शिवसेना-भाजप युतीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, मी भाजप आणि शिवसेना युतीचा शुभचिंतक आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर माझी श्रद्धा आहे. ही युती हिंदुत्वाच्या समान वैचारिक भूमिकेवर बनली आहे. लग्न झाल्यावर आदळआपट होत असते, जसे नवरा-बायकोत भांडण असते तशाच युतीतही काही कुरबुरी असतील. पण हे नाते तुझे माझे जमेना व तुझ्यावाचून करमेना असेच आहे, असेही ते म्हणाले, मात्र राजकारणात कायमचे मित्र व कायमचे शत्रू नसतात. राजकारणात काहीही होऊ शकते, असे विधानही यावेळी त्यांनी केले.

दिल्लीत रमलो आहे

महाराष्ट्रातून दिल्लीत गेलो तेव्हा सुरुवातीला वाईट वाटले होते, पण आता दिल्लीत रमलो आहे. आता चुकूनही राज्यात येणार नाही. पक्षाने आदेश दिला तरी महाराष्ट्रात येणार नाही, असे गडकरी यांनी ठामपणे सांगितले.

स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा

स्वतंत्र विदर्भासाठी भाजप अनुकूल आहे. लहान राज्यांच्या बाजूने भाजप आहे. म्हणून या मागणीला आम्ही पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचा त्याला पाठिंबा लागेल. घटनात्मक दुरुस्तीची गरज भासेल, असेही ते म्हणाले.

ईव्हीएम बंद पडणे गंभीर

पोटनिवडणुकांतील ईव्हीएम बंद पडल्याबाबत विचारले असता मशीन बंद पडणे ही बाब गंभीर आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घेतलीच पाहिजे. पण पंजाबमध्ये काँग्रेस जिंकली, कर्नाटकमध्ये मनासारखे सरकार आले की काँग्रेसला काही वावगे वाटत नाही, पण कुठे भाजप जिंकायला लागली तर काँग्रेसला लगेच त्रास होतो ही दुहेरी भूमिकाही योग्य नसल्याचे ते म्हणाले. इंधन दरवाढीबाबत विचारले असता विरोधी पक्षात होतो तेव्हा आम्हीदेखील आंदोलने केल्याचे सांगून ते म्हणाले, पेट्रोल-डिझेलचे दर आता आंतरराष्ट्रीय दराशी निगडित आहेत. त्यावरील सबसिडी आता काढून टाकली आहे. सबसिडीची रक्कम आता अन्य समाजोपयोगी कामांसाठी वापरण्यात येते असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.

राजकीय अस्पृश्यता संपवा

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची संघाच्या कार्यक्रमाला हजेरी याबद्दल ते म्हणाले, संघ हा काही पाकिस्तानी नाही. ती राष्ट्रभक्त संघटना आहे. देशात जर लोकशाही अधिक बळकट करायची असेल तर राजकीय अस्पृश्यता संपली पाहिजे. या घटनेकडे याच दृष्टिकोनातून बघितले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.

 मुख्यमंत्र्यांच्या क्लिपचे समर्थन

पालघर लोकसभा पोटनिवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑडिओ क्लिपबाबतही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे समर्थन केले. मी देवेंद्रना लहानपणापासून ओळखतो. ते अतिशय सुसंस्कृत आहेत. कोणावरही इतके आक्रमक ते बोलणार नाहीत. साम-दाम-दंड-भेद याचा शब्दशः अर्थ न घेता पूर्ण शक्तिनिशी लढणे असा घ्यायला हवा. त्यांच्या बोलण्याचा भाव वेगळा होता, असेही गडकरी म्हणाले.