
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप हंगामातील पिके पावसाअभावी वाळून गेली आहे. गत काही काळापासून शेतकरी कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करत दरवर्षी अपेक्षा ठेऊन संघर्ष करीत आहे. ऐन पीक बहरात असतानाच पावसाने उघडीप दिल्याने तोंडाशी आलेला घास गमविण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्याची यादी जाहीर केली आहे. यामध्ये देऊळगावराजा व चिखली तालुका वगळण्यात आला आहे. त्यामुळे देऊळगावराजा व चिखली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जालना येथे भेट घेऊन मागणी केली आहे केली आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आदी मंडळी उपस्थित होते.
देऊळगावराजा व चिखली तालुक्यात खरीप हंगामात दमदार पावसाचे आगमन होऊ न शकल्याने सोयाबीन, मका, कपाशी व अन्य पीक वाळून गेले आहे. पावसाचा खंड दोन महीने पेक्षा जास्त असून सोयाबीन, मका तसेच कापूस ही पिके पूर्णपणे वाळली आहे. अशा परिस्थितीत पावसाअभावी वाढत्या तापमानाने पिके धोक्यात आले आहे. पावसाअभावी हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कपाशीचे पीक गमावण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. दिवाळी सारखा सण कसा साजरा करावा परिवाराचा उदरनिर्वाह करण्याची मोठी समस्या शेतकर्यांपुढे उभी राहिली आहे. तालुक्यातील खडकपूर्णा धरणासह अन्य छोटे मोठे प्रकल्प कोरडे ठणठणीत तर काही ठिकाणी जलसाठा नगण्य अवस्थेत पोहचल्याने अनेक गावात पिण्याच्या व जनावरांना पिण्याच्या पाण्यावर व परिसरातील सिंचन क्षेत्रावर विपरीत परिणाम जाणू लागला आहे. त्यामुळे सर्वत्र दुष्काळाचे गडद सावट कोसळलेली आहे. दमदार पाऊस न पडल्यामुळे खडकपुर्णा धरणात व इतर सिंचन प्रकल्पात पाहिजे तेवढे पाणी जमा होऊ शकले नाही. त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिके शेतकर्यांच्या हातची गेली आहे. अशी भीषण परिस्थिती आहे नुकतीच कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पाहणी केली, देऊळगावराजा तालुका दुष्काळग्रस्त यादीत नसल्याने हा तालुक्यातील शेतकर्यांवर अन्याय असल्याचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सांगितले.

































































