फडणवीसांनी टाकली मिंधे-दादांमध्ये वादाची ठिणगी; भाजप लोकसभेच्या 26 जागा लढणार असल्याची परस्पर घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेचे जागावाटप परस्पर जाहीर करून मिंधे गट आणि अजित पवार गटामध्ये वादाची ठिणगी टाकली आहे. भाजप लोकसभेच्या 26 जागा लढणार अशी घोषणा फडणवीसांनी केली. उर्वरित 22 जागा मिंधे गट आणि अजित पवार गट एकत्रितपणे लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावरून मिंधे आणि अजितदादा गटामध्ये नाराजी पसरली असून या मुद्दय़ावरून त्यांचे भाजपबरोबर खटके उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. सर्वच पक्षांमध्ये जागांची गणिते मांडली जात आहेत. भाजप-मिंधे गट-अजित पवार गट यांच्यात जागावाटपावरून अद्याप निर्णय झाला नसल्याचे तिन्ही बाजूंचे नेते सांगत असतानाच आज देवेंद्र फडणवीस यांनी 48 पैकी 26 जागा भाजप लढवेल, असे एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत जाहीरच करून टाकले.

फडणवीस यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजप 26 जागा लढवणार असेल तर मिंधे-पवार गटाच्या वाटय़ाला 22 जागा येणार आहेत. दोघांना समान वाटप केले तर प्रत्येक गटाच्या पदरात 11-11 जागा पडतील, परंतु त्यावर हे दोन्ही गट समाधानी होतील अशी स्थिती नाही. कारण मिंधे गटाने आधीच 22 जागांवर दावा केला आहे.

मिंधे गटाने 22 जागांवर दावा केला असला तरी शिवसेनेचे 18 पैकी 13 खासदार मिंधे गटाबरोबर आहेत. तेवढय़ाच जागा सोडण्याची भाजपची तयारी होती, परंतु आज मिंधे गट आणि अजित पवार गट एकत्रितपणे 22 जागा लढेल, असे सांगून फडणवीस यांनी त्या दोन गटांमध्ये झुंज लावून दिली आहे. आता 22 जागांचे वाटप कसे करायचे हा निर्णय सर्वस्वी मिंधे गट आणि अजित पवार गटाचा आहे.

अजित पवारांनी बोलणे टाळले

भाजपकडे सध्या 23 खासदार असल्याने त्यापेक्षा एकही जागा कमी घेण्यास भाजप तयार नाही. उलट आणखी जागा भाजपला हव्या आहेत, परंतु मिंधे गट आणि अजित पवार गटाची मागणी पाहता त्यांना आकडा वाढवणे अवघड झाले आहे. अजित पवार यांनी फडणवीस यांच्या या घोषणेबद्दल प्रतिक्रिया देणेही टाळले आहे, तर मिंधे गटाचा कोणताही बोलघेवडा नेता अद्याप त्यावर बोललेला नाही.