
विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता यांच्यासह बुधवारी सपत्नीक केदारनाथचे दर्शन घेतले. जनतेचा कौल आपल्याला मिळावा यासासाठी राजकीय नेते मंडळी व उमेदवारांनी प्रार्थना, जपतप सुरू केले आहेत. तर काहीजण देवदर्शनाला जात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केदारनाथाचे दर्शन घेऊन नक्की काय मागितले असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील केदारनाथ येथील गुंफेत ध्यानधारणा केली होती.
भाजप प्रदेश कार्यालयात दहा हजार लाडवांचा बेत
भाजपने विजयोत्सवाची तयारी सुरू केली आहे. दहा हजार मोतीचूर लाडवांसह नरीमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयाच्या परिसरात निवडणूक निकालांसाठी दोन मोठे टीव्ही स्क्रीन, स्टेज अशी जय्यत तयारी केली आहे. एक्झिट पोलमध्ये शिवसेना-भाजप महायुती पुन्हा राज्यात सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवल्यामुळे भाजपने नरीमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे. मोतीचूर लाडू तयार करण्याचा घाट घातला आहे. दिवसभरात पाच हजार मोतीचूर लाडू तयार झाले असून निकाल जाहीर होईपर्यंत आणखीन पाच हजार मोतीचूर लाडू तयार होतील असे सांगण्यात आले. प्रदेश कार्यालयाच्या बाहेर स्टेज, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या प्रतिनिधींनी बाइट देण्यासाठी माइक स्टॅण्ड, विद्युत रोषणाई, पावसापासून बचाव करणारा मंडप अशी जय्यत तयारी आहे. निकाल येण्यास सुरुवात झाल्यावर काही मिनिटांतच ढोलताशे वाजू लागतील याचीही काळजी घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.
काँग्रेस कार्यालयात नीरव शांतता
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होत असताना राहुल गांधींच्या तीन-चार सभा वगळता काँग्रेसचा कुणी बडा नेता प्रचारासाठी फिरकला नाही. यामुळे सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या गोटात कमालीची अस्वस्थता असून मतदानोत्तर चाचण्यांच्या अहवालानंतर तर काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही विशेष तयारी करण्यात आलेली नाही. काँग्रेस कार्यालयात नीरव शांतता असल्याचे चित्र आहे.
मुंबईपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रमुख लक्ष ग्रामीण भागात केंद्रित झाले आहे. त्याचप्रमाणे एक्झिट पोल पाहिल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही फारसा उत्साह राहिलेला नाही. कुलाब्यातील तन्ना हाऊसमधील काँग्रेस कार्यालय, दादरच्या टिळक भवन येथील कार्यालयांत निवडणूक निकालाची विशेष उत्सुकता नसल्याचेच दिसून आले. कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त या कार्यालयांकडे फारसे कार्यकर्ते फिरकले नाहीत.



























































