
भाजपचे खासदार निशिंकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल अत्यंत घाणेरडे शब्द वापरले. ‘महाराष्ट्रात एकही उद्योग नाही. मराठी माणूस दुबे आणि चौबेच्या पैशांवर जगतोय, असे तारे निशिकांत दुबे यांनी तोडले. मराठी माणसाला आपटून आपटून मारू, अशी धमकीही त्यांनी दिली. यावर भाजप आणि मिंधे गटाच्या एकाही नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही, ना निशिकांत दुबे यांना याचा जाब विचारला. यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली. मात्र त्यांनी निशिकांत दुबे यांना धारेवर धरण्याऐवजी बोटचेपीच भूमिका घेतली. निशिकांत दुबे सरसकट मराठी माणसाला बोललेच नाहीत, असे विधान फडणवीस यांनी केले.
पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विधिमंडळाच्या आवारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र आणि मराठी माणसाविरुद्ध गरळ ओकणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याबाबत त्यांना विचारण्यात आले. याला फडणवीस यांनी गोलमटोल उत्तर दिले.
निशिकांत दुबे हे सरसकट मराठी माणसाला म्हणाले नाही, तर संघटनेबद्दल बोलले. पण अशा प्रकारे बोलणे योग्य नाही. कारण त्याचे जे अर्थ निघतात ते लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात, अशी बोटचेपी भूमिका फडणवीस यांनी घेतली.
मराठी माणसाला पटकून मारणं मोदी-शहांचे बूट चाटण्याइतकं सोपं नाही, नादाला लागू नका! संजय राऊत कडाडले