
हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात वॉरबुकप्रमाणे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पाकिस्तान एक दहशतवादी राष्ट्र असून, त्याने नेहमीच दहशतवादाचे समर्थन केले आहे. हिंदुस्थानचे सैन्य पाकिस्तानला योग्य ते प्रत्युत्तर देत आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र आळंदी येथे आयोजित ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव’ कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला.
त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हिंदुस्थानने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावत त्यांना चोख प्रत्युतर दिले आहे. पाकिस्तान एक दहशतवादी राष्ट्र आहे हे सर्वश्रुत आहे. त्याने नेहमीच दहशतवादाचा पुरस्कार केला. मात्र, आता हिंदुस्थान थांबणार नाही. भारतीय सैन्याचा आम्हाला गर्व आहे, असे ते म्हणाले.
हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात वॉरबुकनुसार कारवाई केली जात आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था व सुरक्षेच्या मुद्दय़ावर काल बैठक घेतली. सरकार या प्रकरणी वॉरबुकप्रमाणे जी काही खबरदारी घ्यायची आहे, ती सगळी घेत आहे. सर्वच प्रकारचे कोऑर्डिनेशन सर्व जिल्हा यूनिट्सना योग्य ती माहिती व संसाधने दिली जात आहेत, असेही फडणवीस म्हणाले.