साध्वी यांनी करकरेंबद्दल असे बोलायला नको होते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इंदूर

मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून प्रचंड वादळ उठले. हे वादळ अजून थांबले नसतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद करकरेंबद्दल साध्वी प्रज्ञासिंह यांनी असे बोलायला नको होते असे मत व्यक्त केले आहे.

करकरे यांनी कधीही हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग केला नाही. सर्वात आधी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी हा उल्लेख केला होता. त्यानंतर तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि नंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हा शब्दप्रयोग केला असा आरोप फडणवीस यांनी केला. इंदूरमध्ये एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, मालेगाव स्फोटातील साक्षीदार दिलीप पाटीदार यांचा नोव्हेंबर 2018 मध्ये गूढ मृत्यू झाला होता. त्याबाबत विचारले असता एनआयए याप्रकरणी तपास करत असल्याचे फडणवीस म्हणाले.

करकरे शहीदच – भाजपची भूमिका
करकरे हे मायभूमीच्या रक्षणासाठीच शहीद झाले. भाजपने तशी भूमिका आधीच स्पष्ट केलेली आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे भाजपने स्पष्टपणे नमूद केले असून त्यांनीही आपले विधान मागे घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.