अजित पवार समर्थक अमरावतीमधील आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. चांगल्या मुली नोकरदारांना मिळतात, दोन नंबरच्या काळय़ा मुली पानवाल्यांना तर तीन नंबरचा उरलासुरला गाळ शेतकऱ्यांच्या मुलांच्या पदरात पडतो, असे वक्तव्य भुयार यांनी केल्याने महिला वर्गात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. राजकीय वर्तुळातूनही भुयार यांच्यावर टीका होत आहे.
आमदार देवेंद्र भुयार यांनी जाहीर कार्यक्रमात हे वक्तव्य केले. स्मार्ट पोरगी हवी असेल तर त्यासाठी पोरगा नोकरीवाला पाहिजे. ज्यांचा पान ठेला आहे, धंदा आहे किंवा किराणा दुकान आहे, अशा माणसाला दोन नंबरची पोरगी भेटते आणि तीन नंबरचा गाळ, रखडलेली पोरगी शेतकऱ्यांच्या पोरांना भेटते, शेतकऱ्यांच्या पोरांचे काही खरे राहिले नाही, अशा भुयार यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
शेतकरी, महिलांची टिंगल – सुषमा अंधारे
मिंधे गट आणि अजित पवार समर्थकांना बोलण्याचे ताळतंत्र राहिलेले नाही. देवेंद्र भुयार यांचे वक्तव्य हे केवळ स्त्रियांचा नाही तर शेतकऱ्यांची टिंगलटवाळी करणारे आहे. शेतकरी आणि महिलांची टिंगल करणे हाच तुमचा अजेंडा आहे का हे एकदा अजित पवार यांना विचारले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेता सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
बेताल आमदारांना आवरा – यशोमती ठाकूर
महिलांच्या मतांसाठी एकीकडे जिवाचे रान करता आणि दुसरीकडे महिलांचे वर्गीकरण करून तुम्ही महिलांचा अवमान करता, यावरून देवेंद्र भुयार यांची मानसिकता समजते. महिला हे उपभोगाचे साधन आहे का? अजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या बेताल आमदारांना आवर घालावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली.