देवगड हापूसच्या मोहराला बुरशीचा विळखा, 99 टक्के बागायती रोगाच्या सावटाखाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगप्रसिद्ध ‘देवगड हापूस आंबा’ आता नव्या संकटात सापडला आहे. या वर्षीच्या नव्या हंगामात पहिलाच मोहर झाडावरच कोळशासारखा काळा पडल्याने बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत. उपचार म्हणून महागडय़ा कीटकनाशकांच्या फवारण्या केल्यानंतरही गुलाबी थंडीच्या धुक्यात बुरशीने मोहरावर आघात करून  तालुक्यातील बागायतदारांच्या मेहनतीला निराशेचा सुरुंग लावला आहे.

बुरशीजन्य रोगाची ही परिस्थिती तालुक्यात प्रथमच उद्भवली असून तालुक्यातील सुमारे 99 टक्के बागायती या रोगाच्या सावटाखाली आहेत.  त्यातच तुडतुडय़ाचे प्रमाणही अधिक असल्यामुळे हा संपूर्ण मोहर कोळशासारखा काळा दिसत आहे. दरम्यान, दरवर्षी नवनवीन संकटे आंबा बागायतदारांना मेडसावत आहेत, परंतु गेल्या 25 वर्षांपासून कीटकनाशक फवारणीचे एकच शेडय़ूल बागायतदार राबवीत आहेत. यात कोणताही बदल कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, संशोधक अथवा तज्ञ मार्गदर्शकांकडून केला गेलेला नाही. त्याचा मोठा परिणाम दरवर्षी आंबा उत्पादनावर झालेला दिसत असल्याचे  आंबा बागायतदार भूषण बोडस यांनी स्पष्ट केले.

या वर्षी नव्या हंगामात आंबा कलमांना चांगल्या प्रकारे मोहर आला होता.  या वर्षी थंडीचे प्रमाण चांगले राहिल्याने लवकरात लवकर फळधारणा होईल, अशी अपेक्षा बागायतदार बाळगून होते. मात्र, थंडीतील दवाचे प्रमाण अधिक राहिल्याने हा मोहर झाडावर ओलसर बनून बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे.

भूषण बोडस, आंबा बागायतदार, पडेल