पहिल्याच पावसात देवणे पुलाची दुरवस्था; शासनाचा कोट्यवधीचा निधी पाण्यात

खाडीपट्टा विभागाला जोडणाऱ्या जगबुडी नदीवरील देवणे पुल रस्ता पहिल्या पावसातच पूर्णपणे उखडून गेला असल्याने या रस्त्यावर खर्च केलेला करोडो रुपयांचा शासकिय निधी पाण्यात गेला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजनशून्य कामामुळे शासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून हे नुकसान संबधित अधिका-यांच्या वेतनामधून वसूल करण्यात यावे अशी मागणी खाडीपट्टा पसिरातील सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपूरकर यांनी केली आहे. खेड तालुक्यातील खाडीपट्टा परिसरातील सुमारे 20 ते 25 गावांना जोडणारा देवणे पुल हा अतिशय महत्वाचा पुल आहे. जगबुडी नदीवरील या पुलामुळे खाडीपट्ट्यात जाण्याचे अंतर सुमारे 5 किलोमिटरने कमी झाले आहे. खाडीपट्टा परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार 2016 मध्ये या पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली होती. सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर पुलाच्या कामाचा नारळ फुटला होता.

100 मीटर लांबी असलेल्या या पुलाचे काम ठेकेदार कंपनीने संप्टेंबर 2019 अखेर पुर्ण करायचे होते मात्र हे काम रखडल्याने खाडीपट्टा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपुरकर यांनी 20 डिसेंबर 2020 रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण सुरु केले होते. यावेळी तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी खेड येथे येऊन पुलाचे काम 31 मार्च 2021 अखेर पुर्ण होईल असे लेखी आश्वासन दिले होते.

या आश्वासनानंतर राजपुरकर यांनी उपोषण मागे घेतले मात्र दिलेल्या आश्वासनानुसार पुलाचे काम न झाल्याने पुन्हा उपोषणाचा इशारा देण्यात आला. या इशाऱ्यानंतर संबधित ठेकेदाराने 8 जून 2021 रोजी भर पावसात पुल रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले. भर पावसात केलेले डांबरीकरण टिकणार कसे? असा प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आला मात्र संबधित ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान भर पावसात केलेले सांबरीकरण वाहून गेले आणि या कामासाठी खर्च करण्यात आलेला शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी पाण्यात गेला. इतकेच नव्हे तर घाईगडबडीत तयार केलेला नगरपालिका हद्दीत येणारा पुलाचा जोडरस्ताही खचला. त्यामुळे खाडीपट्टा परिसराला जोडणारा हा महत्वाचा पुल धोकादायक झाला आहे.

कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या पुलाचे डांबरीकरण पहिल्याच पावसात वाहून गेल्याने खाडीपट्ट्यात जाण्यासाठी. आता पुन्हा 5 किलोमिटरचा हेलपाटा मारावा लागत आहे. देवणे पुलाचा खचलेला जोडरस्ता आणि वाहून गेलेले डांबरीकरण याला संबधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार असून अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच पुलाची दुरवस्था झाल्याचा आरोप खाडीपट्टा परिसरातील ग्रामस्थ करत आहेत. पुलाचे जे नुकसान झाले आहे ते नुकसान संबधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करावे यासाठी आम्ही लवकरच न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे जलाल राजपुरकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या