सहा दिवसांत 3,900 उड्डाणे रद्द… डीजीसीएने इंडिगोच्या सीईओ आणि उच्च अधिकाऱ्यांना समन्स

सलग आठव्या दिवशी इंडिगोची उड्डाणे पूर्ववत झाली नसल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सोमवारीही इंडिगोची 300 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. इंडिगो एअरलाइन्सच्या कारभाराबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) कडक भूमिका घेतली आहे. डीजीसीएने चार सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून या समितीने इंडिगोच्या सीईओसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या बैठकीत गेल्या सहा दिवसांत रद्द झालेल्या 3,900 उड्डाणांबाबत इंडिगोच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समिती या आठवड्यात सीईओ पीटर एल्बर्स आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. समितीने इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंगळवारी दिल्लीतील मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ही समिती प्रामुख्याने व्यवस्थापनाकडून होणाऱ्या उल्लंघनांची चौकशी करेल आणि जबाबदार अधिकाऱ्यांची थेट चौकशी करेल.

आठवडाभरात इंडिगोची शेकडो देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्यामुळे हजारो प्रवासी विमानतळावर अडकून पडले होते. उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. शिवाय पर्यटन उद्योगाचेही कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.