आता धनगर समाजाचा आरक्षणासाठी सरकार विरोधात एल्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । माजलगाव

धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देत भाजपने सत्ता काबीज केली. आता या आश्वासनांची जाणीव करून देण्यासाठी धनगर समाज पक्षभेद विसरून एकत्र आला आहे, सत्ताधाऱ्यांनी २१ सप्टेंबर पर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा आरक्षणासाठी समाज महामेळावा घेऊन एल्गार पुकारणार असल्याची घोषणा आमदार रामराव वडकूते, गणेश हाके यांनी केली.

मराठा आरक्षण आंदोलनानंतर आता धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीने जोर धरला आहे. गुरुवारी येथे एक बैठक घेऊन धनगर समाज नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. आमदार रामराव वडकूते म्हणाले की, धनगड-धनगर अशा शब्दांच्या चुकीने आरक्षणास अडथळे निर्माण झाले आहेत. सध्याच्या सरकारने 2013 मध्ये आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आमचा समाज पाठिशी राहिल्याने भाजपची सत्ता आली, हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले आहे. तसेच पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण मंजूर करू, असे सांगितले होते. परंतु आज 250 कॅबिनेट बैठका झाल्या. तरीही हा निर्णय होत नाही. त्यामुळे हे सरकार फसवणूक करत आहे, अशी भावना समाजात निर्माण झाली आहे. म्हणून सर्व पक्ष-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मतभेद विसरून समाज म्हणून धनगर समाज आरक्षण समिती स्थापन केली आहे. त्यामार्फत 21 सप्टेंबर रोजी परभणी येथे महामेळावा घेऊन सरकार विरोधात एल्गार पुकारण्यात येणार आहे. या नंतरही निर्णय न झाल्यास 28 आक्टोबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती या वेळी रामराव वाडकुते, गणेश हाके यांनी दिली.

या पत्रकार परिषदेस विठ्ठलराव रबदडे, बबन सरवदे, विष्णू देवकते, विकास बिडगर, सुरेश भुमरे, कल्याण आबुज, तुकाराम येवले यांची उपस्थिती होती.