
सामना ऑनलाईन, बीड
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर हे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा येथे गेले होते. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी ते त्यांच्या बंधूंसह गेल्याचं वृत्त सामना ऑनलाईनने दिलं होतं.
गणपती दर्शनासाठी क्षीरसागर वर्षावर, राष्ट्रवादीच्या पोटात गोळा
या भेटीवरून बीड जिल्ह्यातील वातावरण तापायला लागलं आहे. क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, मात्र त्यांची भाजपशी सलगी वाढायला लागली आहे. या भेटीवरून धनंजय मुंडे यांनी क्षीरसागर यांना टोले लगावले आहेत. बीडमध्ये आमदार व्हायचे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचा नव्हे तर राजुरीच्या गणपतीचा आशीर्वाद मिळावा लागतो अशा शब्दात मुंडे यांनी क्षीरसागर यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.
पुन्हा सत्ताप्राप्तीसाठी मुंडेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शरद पवारांची ऑक्टोबरमध्ये सभा
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा शनिवारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांनी भाषण केले. या भाषणामध्ये क्षीरसागर यांचे नाव न घेता मुंडे यांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचा 10 दिवस आशीर्वाद घेतला तरी त्या पेक्षा राजुरीचा आशीर्वाद महत्वाचा आहे. राजुरी इथे गणपतीचे मंदीर असून ते जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या ठिकाणाला राजकीय महत्व देखील आहे, कारण राजुरीची ग्रामपंचायत ही संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे. संदीप हे जयदत्त क्षीरसागरांचे पुतणे आहेत आणि दोघांमधील संबंध ताणले गेलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व हे आपल्यापेक्षा संदीप क्षीरसागर यांना झुकतं माप देत असल्याने जयदत्त क्षीरसागर हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. शरद पवार हे १ ऑक्टोबरला बीडमध्ये सभा घेणार आहेत. त्याआधी म्हणजे ३१ सप्टेंबरला पवार हे संदीप क्षीरसागर यांच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहेत. यामुळे जयदत्त क्षीरसागरांच्या नाराजीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.




























































