
धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे 17 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण यापुढील काळामध्ये चालू ठेवायचा निर्धार आंदोलकांनी घेतला आहे. यावेळी आंदोलकांनी राज्यातील मिंधे सरकारने काढलेल्या निर्णयाची होळी करीत संताप व्यक्त केला. दरम्यान, नगर-कल्याण महामार्गावर ढोकी फाटा येथे धनगर बांधवांनी शेळ्या-मेंढय़ासह रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या सतरा दिवसांपासून यशवंत सेनेच्या वतीने आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. 16 दिवसांनंतर गुरुवारी सरकारने या आंदोलनाची दखल घेत मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि धनगर समाजाचे विविध क्षेत्रातील प्रतिनिधी यांची बैठक घेतली होती. मात्र, यावेळी आरक्षणाबाबत कोणताच तोडगा न निघाल्याने ही बैठक निष्फळ झाली.
राज्य सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्याऐवजी वेगवेगळे निर्णय घेऊन वेळकाढूपणा करत आहे. सरकारने घेतलेले बैठकीतील निर्णय आम्हाला मान्य नाहीत. सरकारच्या निर्णयाची आम्ही होळी केली आहे. यामुळे आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर आता आणखी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे व आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही- घनश्याम हाके,प्रदेशाध्यक्ष, धनगर युवक संघ
उपचार थांबवून रूपनवर चौंडीत आले
धनगर समाज आक्रमक झाला असून, पुणे येथे उपचार घेत असलेले आंदोलनकर्ते अण्णासाहेब रूपनवर यांनी उपचार थांबवून थेट चौंडी येथे आज आले. रूपनवर यांनी आक्रमक भूमिका घेत यापुढे आपण कोणताही उपचार घेणार नसल्याचे सांगितल़े जोपर्यंत सरकार धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेऊन एस.टी. सर्टिफिकेट देत नाही, तोपर्यंत उपोषण चालू राहणार, अशी भूमिका रुपनवर यांनी जाहीर केली आहे. यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाच्या बाहेर जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या निर्णयाची होळी केली. यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे, प्रदेशाध्यक्ष घनश्याम हाके, अक्षय शिंदे यांच्यासह राज्यभरातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.
नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको
आज नगर-कल्याण महामार्गावर ढोकी फाटा या ठिकाणी धनगर बांधवांनी शेळ्या-मेंढय़ांसहित रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे या महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. मागण्यांचे निवेदन पारनेर तहसीलदारांना देण्यात आले. या आंदोलनाला पारनेर तालुक्यातील अनेक गावचे सरपंच तसेच पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होत़े सरपंच भागा गावडे, सुकदेव चितळकर, गंगाधर कोळेकर, सरपंच बापू मोरे, बाबासाहेब सासवडे, बाबासाहेब नऱहे, आप्पासाहेब नरे, सरपंच राजू रोडे, संतोष तमनर, भास्कर खटके, किरण धरम आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.























































