
>> धनश्री देसाई
भारतीय संस्कृतीत अनेक रुपांनी आविष्कृत झालेल्या दुर्गादेवीत ‘बुद्धिरुपेण शक्तिरुपेण…’ या तत्वांची अद्भुत संगती पाहायला मिळते. विजयादशमीला आपण सरस्वतीपूजा आणि शस्त्रपूजा करतो. या पूजा याचेच द्योतक आहेत.
नवरात्रीचा भारतीय संस्कृती ही केवळ परंपरांची साखळी नसून जीवनाला दिशा देणारी शाश्वत मूल्यांची शिदोरी आहे. या संस्कृतीत प्रत्येक सणाचा, प्रत्येक प्रथेचा एक गडद अर्थ दडलेला आहे. शारदीय नवरात्र हे त्याचं उत्तम उदाहरण. नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा करताना भक्तांच्या मनात श्रद्धा, धैर्य, प्रेम, करुणा, रौद्र, विवेक अशा सर्व मानवी मूल्यांचे व भावनांचे संचार होतात. नवरात्राची सांगता होते ती विजयादशमीला. या दिवशी एक अद्भुत संगती पाहायला मिळते, सरस्वती पूजा आणि शस्त्रपूजा. एकीकडे सरस्वती यंत्राचे ज्ञान, विवेक, साहित्य, कला यांचे पूजन होते, तर दुसरीकडे शिलांगणाला जाऊन आल्यावर शस्त्रांचे अर्थात सामर्थ्य, धैर्य, पराक्रमाचे पूजन केले जाते. हे दोन्ही परस्परविरोधी वाटतात, पण खरी भारतीय दृष्टी सांगते की, हे दोन आयाम एकमेकांना पूरक आहेत. यामागे खूप पूर्वी ऐकलेली कथा आहे एका प्राचीन गुरुकुलाची.
त्या गुरुकुलात एक वीर, पराक्रमी आणि शस्त्रविद्येत पारंगत तरुण शिष्य होता. त्याच्या हातातील धनुष्याचा बाण कधीच चुकीच्या लक्ष्यावर लागला नाही. युद्धकलेत तो इतका निपुण होता की, इतर शिष्य त्याला ईर्षेने पाहायचे. विजयादशमी जवळ आली होती. गुरुकुलात मोठा सोहळा आयोजित करण्यात आला. गुरूंनी सर्व शिष्यांना सांगितले, “या दिवशी आपण शस्त्रपूजा आणि सरस्वती पूजा करणार आहोत. प्रत्येकाने आपले शस्त्र व आपली पुस्तके यांची सजावट करून आणावी.’’
सरस्वतीची पूजा करण्याची गरजच काय? या त्याच्या प्रश्नाला गुरूंनी उत्तर दिले ते असे. ‘शक्ती असेल पण तिचं मार्गदर्शन करणारी बुद्धी नसेल तर ती शक्ती अराजकता निर्माण करू शकते. शस्त्र हे सामर्थ्याचं प्रतीक आहे, पण त्याला दिशा देणारी सरस्वती आहे. बुद्धिरूपेण सरस्वती आणि शक्तिरूपेण शस्त्र हे दोन प्रवाह एकत्र येतात, तेव्हाच खरा विजय संभव होतो.’
भारतीय संस्कृतीची वीण म्हणजे अध्यात्म, पौराणिक आख्यायिका आणि जीवनशैली यांचा सुंदर संगम आहे. आपल्या संस्कृतीत देवी ही फक्त दैवी शक्ती नाही, तर मानवी जीवनाचे मार्गदर्शन करणारी सजीव प्रेरणा आहे. जर बुद्धी असेल पण कृती करण्याची शक्ती नसेल, तर विचार फक्त कागदावरच राहतात. अगदी तसेच जर शक्ती असेल पण विवेक नसेल, तर ती शक्ती विनाश घडवते. म्हणूनच विजयादशमी हा केवळ रावणदहनाचा किंवा शस्त्रप्रदर्शनाचा उत्सव नाही. हा दिवस आहे समतोल साधण्याचा. भारतीय समाजात याच संतुलनाला महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणूनच आजही शाळांमध्ये विजयादशमीला सरस्वती पूजा होते, तर कारखान्यांमध्ये शस्त्रपूजा. म्हणजे मशिनरीची पूजा होते. शेतकरी नांगराला फुलं अर्पण करतो, तर सैनिक बंदुकीला नमन करतो.कामाचं शस्त्र कोणतंही असो, त्यात शास्त्राची म्हणजेच ज्ञान आणि विवेकाची जोड असली की ते साधन पूजनीय ठरतं.
बुद्धी आणि शक्तीचं एक सुंदर उदाहरण म्हणजे आमच्या महाराष्ट्राचे दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. राजमाता जिजाऊंनी शिवरायांकडून श्रीकारही गिरवला आणि शस्त्राचा वापरही शिकवला आणि म्हणूनच शिवरायांनी प्राप्त केलेला विजय हा कायम बुद्धी आणि शक्ती यांचा संगम ठरला. सामर्थ्याला जेव्हा विवेकाची दिशा मिळते, तेव्हाच ती ऊर्जा धर्मरक्षणाचं कार्य करते आणि हिंदवी स्वराज्याचा पाया भरते.
केवळ बळावर किंवा केवळ बुद्धीवर उभं राहिलेलं जीवन कधीही संपूर्ण होऊ शकत नाही. बुद्धी आणि शक्ती यांचा मेळ जीवनाला विजयाकडे नेत असतो. म्हणूनच आजच्या तरुण पिढीने विजयादशमीचा खरा संदेश ओळखावा. केवळ यशाची महत्त्वाकांक्षा न ठेवता त्यामागे ज्ञान, परिश्रम, नैतिकता आणि समाजहित जोडावे. जीवनातील संघर्ष नेहमीच असतात, पण त्या संघर्षात विवेक आणि सामर्थ्याची जाणीव असेल, तर प्रत्येक दिवसाच्या संघर्षावर आपण मात करू शकतो आणि मग प्रत्येक दिवस आपल्यासाठी विजयादशमी ठरू शकतो.
म्हणूनच विजयादशमीच्या मंगलप्रसंगी ‘बुद्धिरूपेण शक्तिरूपेण नमो नम!’ असे म्हणू या आणि विजयादशमी साजरी करू यात.



























































