
स्वातंत्र्यलढय़ात महात्मा गांधी यांनी इंग्रजांना ‘भारत छोडो’ असा इशारा दिला होता. आज देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी तमाम धारावीकरांनी धारावी गिळंकृत करणाऱया उद्योगपती अदानी यांना ‘धारावी छोडो’चा इशारा दिला. धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे अशा मागणीचा यावेळी जोरदार पुनरुच्चार केला गेला.
धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने ‘धारावी जोडो तिरंगा यात्रा’ कुंभारवाडा नाक्यावरील बिस्मिल्ला हॉटेल येथून सुरू झाली आणि संविधान चौकातील अन्नवेल हॉटेलजवळ सांगता करण्यात आली.
धारावीकरांना बेदखल करून मुलुंड-देवनार-गोवंडी डंपिंग ग्राऊंडवर टाकण्याचे कारस्थान शिजले आहे, पण आम्ही सर्व धारावीकर एक आहोत आणि कोणीही धारावीबाहेर जाणार नाही हा एकतेचा संदेश या यात्रेतून देण्यात आला आहे, असे धारावी बचाव आंदोलनाचे प्रमुख नेते, माजी आमदार बाबुराव माने यांनी सांगितले. कुंभार समाजाला व्यवसाय करण्यासाठी जास्त जागा लागते. त्यामुळे कुंभारवाडय़ासाठी राज्य सरकारने मास्टर प्लॅन तयार करावा तसेच कोळीवाडय़ांचे सीमांकन करून कोळी बांधवांना न्याय द्यावा, असे यावेळी शेकापचे राजेंद्र कोरडे म्हणाले. तर धारावी बचाव आंदोलनाचा धसका घेतल्यामुळेच 12 ऑक्टोबरनंतर धारावीत घरांचे सर्वेक्षण होणार नसल्याचे अदानी कंपनीने जाहीर केले आहे, असे आंदोलनाचे अनिल कासारे म्हणाले.
शेकापचे राजेंद्र कोरडे, शिवसेना महिला उपविभागप्रमुख मंजू वीर, एकता असोसिएशनच्या इशरत खान, सपाचे रहिम मोटारवाला, समाजसेवक आझम जाला, कुसुम गौड, नसीरुल हक, शेकाप विद्यार्थी संघटनेच्या सौम्या कोरडे, आम आदमीचे राफेल पॉल, गौतमी जाधव, कृष्णा गायकवाड, संतोष तांबे, बसपाचे संजीवन जैस्वाल आदींसह असंख्य धारावीकर यात्रेत सहभागी झाले होते.
धारावीतील सव्वा लाख झोपडपट्टीवासीय, दुकानदार, व्यावसायिकांचे धारावीतच पुनर्वसन करा, प्रत्येक झोपडपट्टीधारकास 500 चौरस फुटाचे घर द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.