
मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राला ‘धर्मवीर आनंद दिघे’ यांचे नाव देण्याचा ठराव व्यवस्थापन परिषदेमध्ये झाला असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होते. अखेर आज युवासेनेने कल्याण उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देत नामफलकाचे अनावरण केले.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राला त्यांचे नाव दिले जावे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वारंवार करण्यात येत होती. त्याबाबतचा ठरावदेखील मंजूर झाला आहे. यासाठी सिनेट सदस्य, कल्याण स्थानिक पदाधिकारी आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी दोन ते तीन दिवसांपूर्वीच केंद्रप्रमुखांची भेट घेऊन नामकरणाबाबत पाठपुरावा केला होता. मात्र विद्यापीठ प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सिनेट सदस्यांनी ‘धर्मवीर आनंद दिघे-मुंबई विद्यापीठ कल्याण उपकेंद्र’ या नावाचा फलक झळकवण्यात आला. यावेळी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शीतल शेठ देवरुखकर, अल्पेश भोईर, परमात्मा यादव, मिलिंद साटम, धनराज कोहचडे, किसन सावंत, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियमित वर्ग, ग्रंथालयामध्ये पुस्तके नाहीत
कल्याण उपकेंद्राची स्थापना 2024 साली झाली असली तरी दहा वर्षांनंतरही या ठिकाणी मूलभूत सुविधा नाहीत. केंद्रावर पूर्णवेळ संचालक नाही. केवळ एकच स्वच्छता कर्मचारी आहे. परिसरात अस्वच्छता, धुळीचे साम्राज्य असून नियमित वर्ग घेतले जात नाहीत. ग्रंथाल यामध्ये पुरेशी पुस्तके नाहीत. प्रसाधनगृहांची स्वच्छता नाही. पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आहे. आगप्रतिबंधक उपाययोजना नाहीत आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक असलेले साहित्यही वेळेवर मिळत नाही या समस्या लक्षात घेऊन युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सिनेट सदस्यांनी वेळोवेळी आंदोलन केले.