
रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ या चित्रपटाने इतिहास रचला होता. वीरू (धर्मेंद्र), जय (अमिताभ बच्चन) आणि ठाकूर (संजीव कुमार) ही लोकप्रिय पात्रे, गब्बरसिंह (अमजद खान) सारखा खलनायक, बसंती (हेमा मालिनी) सारखी हिरोईन, जबरदस्त अॅक्शन, मनमोहक गाणी आणि लक्षवेधक संवाद यामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटामध्ये धर्मेंद्र यांनी वीरूची भूमिका साकारली होती. तत्पूर्वी त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले होते. त्यामुळे ‘शोले’साठी त्यांना सर्वाधिक मानधनही देण्यात आले होते.
खरे तर ‘शोले’ चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर धर्मेंद्र यांना वीरूची भूमिका करायची नव्हती. त्यांना ठाकूर किंवा गब्बरची भूमिका हवी होती. दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनीही ‘द लल्लनटॉप’शी गप्पा मारताना याबाबत खुलासा केला होता. ही ठाकूरची कथा असून ते गब्बरशी लढत आहेत. त्यामुळे यात आपण काय करणार? असा सवाल धर्मेंद्र यांनी केला होता.
सिप्पी यांनीही ठीक आहे म्हणत धर्मेंद्र यांना ठाकूर किंवा गब्बरची भूमिका देऊ केली होती. मात्र तुम्हाला हेमा मालिनी मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले. अर्थात त्यावेळी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे प्रेम नुकतेच फुलत होते. त्यामुळे धर्मेंद्र यांनी बसंतीच्या प्रेमाखातर वीरूची भूमिका करण्यास होकार दिला. तर संजीव कुमार यांनी ठाकूर आणि अमजद खान यांनी गब्बरची भूमिका साकारली.
दरम्यान, धर्मेंद्र हे ‘शोले’ चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. त्यांना या चित्रपटासाठी दीड लाख रुपये मिळाले होते. त्यांतर ठाकूर बलदेव सिंह यांची भूमिका जिवंत करणारे संजीव कुमार यांना 1.25 लाख रुपये देण्यात आले होते. या काळात अमिताभ बच्चन सुपरस्टार नव्हते. त्यामुळे त्यांना जयच्या भूमिकेसाठी 1 लाख रुपये मानधन देण्यात आले होते. हेमा मालिनीला 75 हजार, अमजद खान यांना 50 हजार रुपये आणि राधाची भूमिका साकारणाऱ्या जया बच्चन यांना सर्वात कमी म्हणजे 35 हजार रुपये मानधन देण्यात आले होते.
जय या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना घेण्याची शिफारसही धर्मेंद्र यांनीच केली होती. रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’मध्ये धर्मेंद्र यांनी स्वत: याबाबत सांगितले होते. मी हे कुणाला सांगत नाही. परंतु आता अमिताभ स्वत:च याबाबत बोलत आहेत. खरे तर ही भूमिका शत्रुघ्न सिन्हा यांना मिळणार होती. मी अमिताभची शिफारस केल्यावर शत्रुघ्नने मला याबाबत मला विचारलेही होते, असे धर्मेंद्र यांनी सांगितले होते.






























































