
ओडिशामधील ढेंकनाल जिल्ह्यातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मोटांगा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गोपालपूर गावाजवळील एका दगडाच्या खाणीत शनिवारी रात्री उशिरा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे खाणीचा काही भाग कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झाला, तर अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच ओडापाडा तहसीलदार आणि मोटांगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण परिसर सील केला असून नागरिकांना प्रवेशावर बंदी घातली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या खाणीला ब्लास्टिंगसाठी परवानगी नसल्यामुळे 8 सप्टेंबर 2025 रोजीच खाण बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करून या ठिकाणी अवैध उत्खनन सुरूच होते.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात टीम आणि ओडिशा आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान युद्धपातळीवर काम करत आहेत. खाणीत मोठे दगड तेथून हटवण्यासाठी मोठ्या मशिनरींचा वापर केला जात आहे. शोध मोहिमेसाठी श्वान पथकाचीही मदत घेतली जात असून आतापर्यंत काही मृतदेहांचे अवशेष सापडले आहेत. ही दुर्घटना रात्रीच्या वेळी घडल्याने नेमके किती मजूर आत अडकले आहेत, याचा अंदाज घेणे कठीण जात आहे. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले असून सध्या बचाव कार्य पूर्ण करण्याला प्राधान्य दिले जात आहे.

























































