
सामना प्रतिनिधी । जळगाव
परिट धोबी समाजाचा अनुसूचीत जमातीमध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज आरक्षण समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कपडे धुण्याचे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर झालेल्या या आंदोलनाने जळगावकरांचे लक्ष वेधुन घेतले. परिट धोबी समाज जळगाव जिल्हाध्यक्ष सर्जेराव बेडीस्कर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.
१९६० पर्यंत धोबी परिट समाज हा अनुसूचीत जमाती प्रवर्गात समाविष्ट होता. त्यानंतर मात्र या समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे आरक्षण देण्यात आले. शासनाने या पुर्वी नियुक्ती केलेल्या डॉ. दशरथ भांडे समितीने अहवाल देऊन एसटी प्रवर्गाचा लाभ देण्याची शिफारस केली आहे. मात्र शासनाकडुन या समितीच्या अहवालाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे कपडे धुण्याचे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आल्याचे बेडीस्कर यांनी सांगितले. यावेळी परिट धोबी समाज बांधवांनी आरक्षाणाची मागणी करणार्या घोषणा देत परिसर दणाणुन सोडला. या आंदोलनामध्ये महिलांसह जिल्ह्यातील परिट धोबी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



























































