धोनीचा खेळ खल्लास? ट्वेण्टी-20तून डच्चू दिल्यानंतर आता वर्ल्ड कपचा मार्ग खडतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

ट्वेण्टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत जोगिंदर शर्माला अखेरचे षटक देऊन हिंदुस्थानसह स्वतःचे नशीब आजमावणारा… 2011 सालच्या वन डे वर्ल्ड कपमध्ये निर्णायक क्षणी युवराज सिंगला मागे ठेवत स्वतः फलंदाजीला येणारा… कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या रूपात वारस दिसल्यानंतर स्वतःहून कसोटीतून माघार घेत वन डेचे नेतृत्व सोडणारा… ही स्तुतिसुमने महेंद्रसिंग धोनीसाठीच. योग्य वेळी अचूक निर्णय घेणार्‍या या पठ्ठ्याचा मात्र इंग्लंडमध्ये 2019 सालामध्ये होणार्‍या वर्ल्ड कपने घात केला. वर्ल्ड कपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करून बाय बाय करण्याचा त्याच्या स्वप्नांना बीसीसीआयकडून सुरुंग लावण्यात आला. आगामी ट्वेण्टी-20 मालिकांमधून त्याला डच्चू देण्यात आला आणि त्याचा खेळ खल्लास झाला अशी चर्चा रंगू लागली. याचमुळे आता त्याचा इंग्लंडमधील होणार्‍या वर्ल्ड कपपर्यंतचा प्रवासही खडतर झाला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

भरवसा नाय

विश्वचषक धोनीची अखेरची स्पर्धा असली तरी कसोटी क्रिकेटमधून त्याने एका झटक्यात निवृत्तीचा निर्णय घेतला होता हे विसरून चालणार नाही. कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीचे कुठलेही संकेत त्याने दिले नव्हते. बीसीसीआयच्या एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्याच्या निवृत्तीचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीत सांगायचे म्हटले तर अनाकलनीय निर्णय तो याही वेळा घेऊ शकतो.

संकेत आधीच मिळाले

मर्यादित षटकांच्या दोनपैकी एका प्रकारातून महेंद्रसिंग धोनीला वगळून निवड समितीने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. ‘बीसीसीआय’च्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले, ऑस्ट्रेलियात 2020 मध्ये होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत ‘माही’ खेळणार नसल्याने त्याला या संघात स्थान देण्यात काही अर्थ नव्हता. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने यावर बरेच काथ्याकूट केले. विराट कोहली आणि रोहित शर्माही या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्या सहमतीनेच त्याला वगळण्याचा निर्णय निवड समितीने यावेळी घेतला.

कामगिरीचा घसरता आलेख     

धोनीने 2018 मध्ये सात टी-20 सामन्यांत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 28 चेंडूंत नाबाद 52 धावांची त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. उरलेल्या सामन्यांत त्याने 51 चेंडूंत 71 धावा केल्या. आगामी विश्वचषक स्पर्धेत यष्टिरक्षक म्हणून धोनी ही पहिली पसंती असेल. मात्र सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांत त्याची कामगिरी कशी असेल त्यावर बरेच काही अवलंबून असेल.

ऋषभ पंतचा पर्याय उपलब्ध

पुढील दोन महिने स्वतःला सिद्ध करण्यासाठी महेंद्रसिंग धोनीकडे सामनेही नाहीत. कारण टीम इंडियाच्या वेळापत्रकात पुढील एकदिवसीय सामने जानेवारी ते मार्चदरम्यान होणार आहेत. निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी पर्यायी यष्टिरक्षकासंबंधी चर्चा केली असून संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतवर विश्वास दाखवला आहे. हिंदुस्थानचा एका माजी खेळाडूने शंका उपस्थित करताना म्हटले आहे, पंत जर चांगला खेळला आणि याउलट धोनीचा फॉर्म खराब राहिला तर विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात त्याला कुठल्या आधारे स्थान देण्यात येईल?