वर्ल्ड कपमधील आव्हान संपले, निवृत्तीबाबत धोनीचे वेट ऍण्ड वॉच

21

सामना प्रतिनिधी । लंडन

130 कोटी हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांच्या स्वप्नांना विश्वचषक उपांत्य लढतीतील टीम इंडियाच्या पराभवाने सुरुंग लावला. स्पर्धेतील चार्म हिंदुस्थानी शौकिनांसाठी संपला. पण माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या वावडय़ाच ठरल्याचे स्पष्ट झालेय. धोनीने त्याच्या निवृत्तीच्या जोरदार चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘वेट ऍण्ड वॉच’ धोरण स्वीकारले आहे. टीम इंडिया इंग्लंडहून पुन्हा मायदेशी परतेल तेव्हाच माहीच्या भवितव्याची उकल तो स्वतःच करील अशी सध्या हवा आहे. या घडामोडींत धोनी येत्या विंडीज दौऱयावर जाणार की नाही हा संभ्रमात टाकणारा प्रश्न उभा ठाकला आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य लढतीत बलाढय़ टीम इंडियाला न्यूझीलंडकडून मनाला जखमा करणारा निसटता पराभव स्वीकारावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर टीम इंडिया वेस्ट इंडीज दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात हिंदुस्थानी संघ 2 कसोटी, 3 वन डे आणि 3 टी-20 लढतींच्या मालिकेत खेळणार आहे. 17 आणि 18 जुलैला बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीची बैठक मुंबईत होणार आहे. त्यात विंडीज दौऱयासाठीच्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाची निवड होणार आहे. धोनी या दौऱयावर जाण्याची शक्यता फारच कमी आहे.

बोर्ड करतेय प्रतीक्षा

माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीचा निर्णय स्वतःच घ्यावा असे क्रिकेटच्या आणि अन्य क्षेत्रांतील मान्यवरांचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे स्वतःच्या भवितव्याबद्दल धोनी काय निर्णय घेतो याची चाचपणी हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) प्रत्यक्ष त्याच्याशी बोलूनच घेणार आहे.

रोहितकडे वन डे आणि  टी-20 संघांचे नेतृत्व

येत्या विंडीज दौऱयात कसोटी वगळता वन डे आणि टी-20 मालिकांतून कर्णधार विराट कोहलीसह जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वरकुमार या प्रमुख अनुभवी क्रिकेटपटूंना विश्रांती दिली जाईल असे बोलले जात आहे. कारण अतिक्रिकेटचा त्रास या सीनिअर खेळाडूंना होऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या