खान्देशच्या कुलस्वामिनीचे होणार 24 तास दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खांदेशची कुलस्वामिनी असलेल्या श्री एकवीरा देवीचे मोठय़ा उत्साहात व जल्लोषात वाजतगाजत स्वागत केल्यानंतर विधिवत पूजन करून देवीची स्थापना करण्यात आली. दरम्यान, मूर्तीसह इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याने, बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, नवरात्रोत्सवात मंदिर 24 तास खुले राहणार आहे. तसेच मंदिर परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱयांची नजर राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

खांदेश कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी मंदिरात विधीवत घटस्थापना करण्यात आली. श्री एकवीरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्याहस्ते पहाटे  5 वाजता सपत्नीक काकड आरती झाली. दुपारी 12 वाजता महाआरती झाल्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

पहिल्या माळेलाच दर्शनासाठी हजारो भाविकांनी एकवीरादेवी मंदिरात गर्दी केली होती. नवरात्रोत्सवात खांदेश कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी जिह्यासह परराज्यातूनही भाविक गर्दी करतात. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांना 24 तास आई भगवतीचे दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस होमगार्ड व सुरक्षा रक्षक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. सायंकाळी अनेक मोठय़ा मंडळांनी देवीच्या मूर्तींची वाजतगाजत मिरवणुका काढल्या. या मिरवणुकांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. यात महिलाही सहभागी झाल्या होत्या.

विविध वस्तूंची खरेदी

तर घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर अनेकांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व वाहनांची खरेदी केल्याने बाजारपेठेत लाखोंची उलाढाल झाली. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडसह पुढे दत्त मंदिर, साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालयाजवळ फुलवाला चौक आदी परिसरात घटस्थापनेचे पूजा साहित्य व दुर्गामूर्ती खरेदीसाठी नागरिकांची व विक्रेत्यांची मोठी गर्दी उसळली होती. सध्याकाळीही अनेक भक्तांनी दुर्गादेवी मूर्ती खरेदीसाठी गर्दी केली. आग्रारोडवर गरबा, रास दांडिया, कीर्तन, भजन, पूजन, मंगलमय महाआरती यासाठीचे साहित्य, पुस्तके खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती.

दिवसातून होते पाचवेळा आरती

नवरात्रोत्सवाच्या काळात देवी भगवतीची दिवसातून पाच वेळा आरती करण्यात येते. पहाटे पाच वाजता काकडा आरती होते. त्यानंतर सकाळी आठ वाजता, दुपारी 12 वाजता मध्यारती, संध्याकाळी सात वाजता आणि रात्री 12 वाजता शेवटची आरती करण्यात येत असते. या विविध आरत्यांचे इच्छुक भाविकांना यजमानपदही दिले जाते.

गर्दीवर सीसीटीव्ही कॅमेऱयांची राहणार नजर

मंदिराच्या आवारासह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतात. सध्याच्या स्थितीत 16 कॅमेरे सुरू आहेत. अजून पाच कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या एकूण 21 कॅमेऱयांद्वारे परिसरावर नजर ठेवली जाणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱयांचा मोठा फायदा होत असतो. नवरात्रोत्सवातील गर्दीच्या काळात मुले  हरिवणे, महिलांच्या पर्स चोरी जाणे आदी प्रकार घडत होते. मात्र सीसीटीव्ही कॅमेऱयांमुळे त्याला चांगलाच आळा बसला आहे. सर्व ठिकाणी लक्ष ठेवणे सोयीस्कर झालेले आहे.

जिल्ह्यात 184 मूर्तींची प्रतिष्ठापना

जिल्ह्यात पोलीस ठाणे निहाय 184 देवींच्या मूर्तींची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यात धुळे शहर 31, आझादनगर 14, देवपूर 5, पश्चिम देवपूर 10, मोहाडी 12, चाळीसगाव रोड 2, साक्री 8, पिंपळनेर 15, सोनगीर 1, धुळे तालुका 14, शिरपूर शहर 8, शिरपूर तालुका 13, थाळनेर 14, शिंदखेडा 5, दोंडाईचा 13 आणि नरडाणा 19 असे एकूण 184 देवींच्या मूर्तींची संख्या आहे. निजामपूरमध्ये मूर्ती नसून 5 ठिकाणी प्रतिमा ठेवून कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.