
सामना ऑनलाईन। दुमका
झारखंडमधे तीन महिला नक्षलवादींसह एकूण सहा माओवादी नक्षलवाद्यांनी सोमवारी येथे शरणागती पत्करली. या नक्षलवादींना हजारीबाग खुल्या तुरुंगात ठेवले जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक वाय. एस. रमेश यांनी सांगितले.
या सर्व सहा माओवाद्यांना पकडण्यासाठी सरकारने बक्षीस लावले होते. नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करल्याने बक्षिसाच्या रकमेचे धनादेश त्यांना देण्यात आले. यावेळी दुमका विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक राजकुमार लाकरा उपस्थित होते.
प्रेमशिला देवी, किरण टुडू, प्रिसीला देवी, भगत सिंग किसकू, सुखलाल डेहरी आणि सिधो मरांडी या सहा माओवाद्यांनी रमेश यांच्यापुढे शरणागती पत्करली. यापैकी प्रेमशिला देवी आणि किरण टुडू हे सीपीआय (माओवादी)चे झोनल कमांडर होते. वरिष्ठ नक्षलवादी महिलांचे शोषण करतात, असे प्रेमशिला आणि किरण यांनी सांगितले.


























































