
रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर माधवन आणि अर्जुन रामपाल अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या धुरंदर या चित्रपटाने जगभरात धुरळा उडवला. प्रत्येकजण या चित्रपटाबाबत बोलताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई केलेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दुसऱ्या भागाच शुटिंग सुरू आहे. मात्र या शुटिंगदरम्यानच चित्रपट कायद्याच्या कचाट्यात सापडलाय.
धुरंदर 2 साठी साऊथ मुंबईमध्ये काही ठिकाणी शुटिंग सुरू आहे. यावेळी ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. फोर्ट परिसरात परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याप्रकरणी ‘धुरंधर 2’ चित्रपटाच्या लोकेशन मॅनेजरविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात रिंकू राजपाल वाल्मिकी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 223 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 1 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे. त्या दिवशी प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त आणि चित्रपटाची संपूर्ण टीम फोर्ट परिसरात उपस्थित होती. शूटिंगदरम्यान एका महत्त्वाच्या सीनसाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता. मात्र यावेळी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे नियमांची पूर्तता न करता ड्रोनचा वापर केल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.






























































