
‘धुरंधर’ या गाजलेल्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या एका अभिनेत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून घरकाम करणाऱ्या ४१ वर्षीय महिलेवर गेल्या १० वर्षांपासून वारंवार बलात्कार केल्याचा गंभीर आरोप या अभिनेत्यावर ठेवण्यात आला आहे.
नदीम खान असे या अटक करण्यात आलेल्या अभिनेत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी रोजी त्याला ताब्यात घेण्यात आले असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
तक्रारदार महिला विविध कलाकारांकडे घरकाम करते. काही वर्षांपूर्वी तिची ओळख नदीम खानशी झाली आणि त्यांच्यात जवळीक वाढली. पीडित महिलेने आरोप केला आहे की, नदीमने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते. या आश्वासनाच्या जोरावर त्याने मालवणी आणि वर्सोवा येथील निवासस्थानी गेल्या १० वर्षांत तिच्यावर अनेकदा अत्याचार केले.
गुन्हा दाखल आणि अटक
जेव्हा नदीमने लग्न करण्यास नकार दिला, तेव्हा पीडित महिलेने वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेची पहिली तक्रार वर्सोवा पोलिसांनी ‘झिरो एफआयआर’ (Zero FIR) म्हणून नोंदवून घेतली आणि त्यानंतर हे प्रकरण मालवणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले, कारण पीडित महिला मालवणी परिसरात राहते आणि पहिली घटना तिथेच घडली होती.
नदीम खान हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंह स्टारर ‘धुरंधर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात झळकला होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



























































