मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यात मजुराला सापडला 10 लाखांचा हिरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यात खोदकामादरम्यान एका मजुराला 4.33 कॅरेटचा हिरा सापडला आहे. या मजुराने दोन दिवसांपूर्वीच ही खाण 200 रुपये पट्टय़ावर भाडय़ाने घेतली होती. मजुराला मिळालेल्या हिऱ्याची किंमत 10 लाख रुपये आहे. हिऱ्याचा लिलाव झाल्यानंतर मजुराला हे पैसे मिळणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

पन्ना जिल्ह्यातील शाहनगरमध्ये राहणारे वसंत सिंह मजुरीचे काम करतात. 25 सप्टेंबरला कल्याणपूर भागात त्यांना 200 रुपये भाडय़ावर 6 मीटर बाय 4 मीटर पट्टा देण्यात आला. त्यावर त्यांना पुढील तीन महिन्यांसाठी खोदकामाची परवानगी दिली होती; पण खोदकामाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे नशीब उजळले. शनिवारी खोदकामात मिळालेले दगड धुताना त्यांना हा हिरा सापडला.

सिंह यांना हा हिरा सापडताच ते आनंदात घरी पोहोचले. कुटुंबीयांना त्यांनी हा हिरा दाखवला. नंतर पन्ना डायमंड ऑफिसर एस. एन. पांडे यांच्यावडे त्यांनी तो हिरा तपासणीसाठी नेला. तपासणीदरम्यान सापडलेला हिरा 4.33 कॅरेटचा असल्याचे कळाले. तो हिरा सिंह यांनी सरकारी कार्यालयात जमा केला. येत्या काही दिवसांत या हिऱ्याचा लिलाव होणार आहे. यातून मिळणाऱ्या पैशांतून 11.5 टक्के सरकारी रॉयल्टी आणि 2 टक्के अन्य करांची रक्कम वगळता उर्वरित सर्व रक्कम वसंत सिंह यांना मिळणार आहे.