डिझेल 81 टक्क्यांनी महागले, युद्धामुळे फिलिपिन्स, नायजेरियात परिस्थिती गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला असून, इंधन संकटाने गंभीर रूप धारण केले आहे. या युद्धाचा सर्वाधिक परिणाम डिझेलच्या किमतींवर झाला असून, काही देशांमध्ये डिझेलचे दर तब्बल 81 टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे जागतिक स्तरावर महागाईचे मोठे संकट उभे ठाकले आहे. फिलिपिन्समध्ये डिझेलच्या किमतीत जगात सर्वाधिक म्हणजे 81.6 टक्के वाढ झाली आहे. यापाठोपाठ नायजेरियामध्ये 78.3 टक्के, मलेशियामध्ये 57.9 टक्के आणि सिंगापूरमध्ये 44 टक्के दरवाढ नोंदवण्यात आली आहे. विकसित देशांनाही याचा फटका बसला असून, अमेरिकेत 41.2 टक्के आणि जर्मनीमध्ये 30.9 टक्क्यांनी डिझेल महागले आहे. कच्चे तेल 116 डॉलरवर गेले आहे.

हिंदुस्थानातील स्थिती

रशियाकडून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा आणि सरकारच्या धोरणांमुळे हिंदुस्थानात डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली नाही. मात्र, औद्योगिक डिझेलच्या दरात प्रति लिटर 22 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे संकेत मिळत आहेत. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यामुळे जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर प्रति बॅरलच्या पार गेला असून, तज्ञांच्या मते युद्ध न थांबल्यास हा दर 150 डॉलरपर्यंत पोहोचू शकतो.