उपवासाचे असेही फायदे

>> शमिका कुलकर्णी, (आहारतज्ञ)

नवरात्रीचा उपवास हा सर्वात मोठा असतो. सतत नऊ दिवस उपवास असतो. मग हे उपवास आरोग्यासाठी चांगले असतात का?

डिटॉक्स – उपवासात आपण ऊर्जादायी पण पचायला हलके पदार्थ खातो. त्याच बरोबर जास्तीत जास्त ताजे आणि ऋतूला धरून पदार्थ खातो. त्यामुळे शरीरातील विषद्रव्यं बाहेर टाकली जातात. फळं, दूध, भरपूर पाणी आणि पेय घेतल्याने शरीराला डिटॉक्स करण्यात मदत होते.

पचनक्रिया सुधारण्यास मदत होते – पचायला हलक्या पदार्थांचा समावेश केल्याने पचनक्रिया सुधारते आणि हलके राहते. त्यामुळे उत्साह वाढतो आणि शरीरात स्फूर्ती टिकून राहते.

ऍसिडिटी किंवा अपचन असल्यास ते दूर होते – मात्र आहारातील पदार्थांची निवड योग्य केली तरच त्याचा फायदा दिसतो.

वजन कमी करण्यास मदत होते – योग्य प्रकारे उपवास केला तर त्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो. उपवासात कमी खाल्ले जाते. त्याच बरोबर सात्विक खाण्याकडे कल असल्याने जास्तीचे वजन सहज कमी होते.

मानसिक स्वास्थ्य – सात्विक आहारामुळे आपले शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न होते. पोटाची घडी बसल्यामुळे ऍसिडिटी, अपचन नाहीसे होते. ऊर्जादायी आहारामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि मन शांत होण्यास मदत होते. उपवासाच्या दिवसात प्राणायाम किंवा देवीचे स्तोत्र म्हणून आपले मन प्रसन्न केले पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या