
कार्यालयात काम करताना अडचणी येतात, काम नीट होत नाही यामागे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. यापैकी एक कारण म्हणजे कामाचा ताण. कामाचा ताण दूर करण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी काही सोप्या ट्रिकचा वापर केल्यास फायदा होऊ शकतो.
कामाच्या ठिकाणी एकाग्रतेने काम करणे आवश्यक आहे. कोणत्याही करियरमध्ये यशस्वी होण्यासाठी ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे तसेच कार्यालयातील वातावरण तणावमुक्त राहणे महत्त्वाचे आहे, कारण जेव्हा ऑफिसमधील कर्मचारी तणावाखाली वावरत असतात तेव्हा काम योग्यरित्या आणि बिनचूक काम होत नाही. यासाठी काही सोप्या ट्रिक्सचा वापर केला तर तणावमुक्त काम करणे सोयीचे होते, कसे? ते जाणून घेऊया.
नाही म्हणायला शिका
ऑफिसमधील कामाचा ताण येण्याचे कारण म्हणजे कामाचा ओव्हरलोड अर्थात अतिरिक्त काम हे असू शकते. यासाठी काही वेळा नाही म्हणणेही उपयुक्त ठरते. याकरिता नाही म्हणायला शिका. अनेक वेळा असे घडते की, तुम्ही नाही म्हणू शकत नसल्यामुळे तुम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्त काम मिळते आणि तुम्ही कोणतेही काम नीट पूर्ण करू शकत नाही. यामुळे तुमच्या मनावर ताणही देता. म्हणूनच तुम्ही नाही म्हणायला शिकणे महत्त्वाचे आहे. जर तुमच्याकडे आधीच पुरेसे काम असेल आणि कोणी तुम्हाला जास्त काम देत असेल तर त्याला सांगा की, तुमच्याकडे आधीच खूप काम आहे आणि तुम्ही आता दुसरे काम सुरू करू शकत नाही. जर खूप ज्येष्ठ व्यक्ती तुम्हाला काम देत असेल आणि तुम्ही नाही म्हणण्याच्या स्थितीत नसाल तर तुमच्या वरिष्ठ व्यक्तीला सांगा की तुमच्याकडे सध्या कोणती कामे आहेत. जेव्हा तुमच्या वरिष्ठांना कळेल की, तुमच्याकडे आणखी बरीच कामे आहेत, तेव्हा ते तुमच्यासाठी सर्व कामांची टाइमलाइन सेट करण्याचे काम करतील आणि तुम्ही ते काम आरामात पूर्ण करू शकाल.
गॉसिपिंग टाळा
अनेक वेळा असे घडते की, अनेक लोक कामाच्या ठिकाणी एकमेकांशी गॉसिप करण्यात वेळ वाया घालवतात. काही वेळ यामुळे मनोरंजन किंवा विरंगुळा होईल, मात्र यामुळे वेळ वाया जाऊ शकतो. कामाच्या ठिकाणी ताणतणावापासून दूर राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वेळ वाया न घालवणे आणि कामावर लक्ष केंद्रित करणे. यामुळे तुमचे लक्ष विचलित होईल, अशा गोष्टींना मनात थारा देऊ नका.
ऑफिसमधून निघण्याआधी दुसऱ्या दिवसाच्या कामाची यादी करा
ही पद्धत तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकेल. सायंकाळी ऑफिस संपण्याच्या 20 मिनिटे वेळ काढून दुसऱ्या दिवशी काय करायचे आहे, या कामांची यादी तयार करा. यामुळे ऑफिसमध्ये आल्यावर काय काम करायचे आहे, याची यादी तुमच्याकडे तयार असेल शिवाय यादीमुळे ऑफिसला आल्यानंतर दिवसभराचे नियोजन करण्यात वेळ घालवावा लागणार नाही. यामुळे वेळ वाचेल आणि कार्यालयात येताच कामाला सुरुवात करता येईल.
5 मिनिटे चाला
सतत बसून काम करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमचे मन थकून जाते. यावेळी कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. यासाठी खुर्चीतून उठून 5 मिनिटे फेरफटका मारण्याचा प्रयत्न करावा.


























































