फातोर्डा स्टेडियमवरील स्टँडला माजी क्रीडामंत्री क्रुझ यांचे नाव द्या – कामत

मडगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवरील स्टँडला माजी क्रिडामंत्री फ्रांसिस्को मोंत क्रुझ यांचे नाव द्यावे, अशी मागणी विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत यानी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. यंदाच्या आयएसएल फुटबॉल स्पर्धेमधील गोव्यातील पहिल्या सामन्याच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्र्याना लिहीलेल्या पत्रात, विरोधीपक्ष नेत्यानी 21 मार्च 1945 रोजी जन्मलेल्या फ्रांसिस्को मोंत क्रुझ यांचे यंदा 75 वे जन्मवर्ष असल्याचे नमूद करून, त्यांच्या हयातीत हा नामकरण सोहळा व्हावा अशी मागणी केली आहे.

गोव्यातील पहिला आंतराष्ट्रीय स्डेडियम अवघ्या सहा महिन्यात पुर्ण करण्यात माजी क्रिडामंत्र्यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगून, स्डेडियम ठरलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतल्याचे म्हटले आहे. स्वतः लक्ष घालून तसेच योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन स्डेडियमच्या बांधकामात सहभागी झालेल्यांना प्रोत्साहन देत त्यांनी विक्रमी वेळेत 1989 मध्ये गोव्याचा पहिला स्डेडियम उभारला. ठरलेल्या दिवशी तेथे पहिला आंतराष्ट्रीय फुटबॉलचा सामना खेळविण्यात आला, याकडे कामत यांनी लक्ष वेधले आहे. फुटबॉल, क्रिकेट तसेच इतर खेळांसाठी या स्डेडियमचा उपयोग होत असून, गोव्यात पहिले आंतराष्ट्रीय स्टेडियम उभे राहिले आहे, असे कामत यांनी सांगितले. गोव्याच्या क्रिडाक्षेत्रातील वैभवशाली असा प्रकल्प उभारुन क्रिडाक्षेत्रास महत्त्वाचे योगदान देणाऱ्या फ्रांसिस्को मोंत क्रुझ यांचा सन्मान करणे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे सरकारने ही सूचना मान्य करावी, असे पत्रकात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या