
सामना ऑनलाईन, मुंबई
मध्य रेल्ववर लवकरच एकूण 70 डिजिटल स्क्रीनवर युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या गॉथिक शैलीतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या इमारतीची 360 डिग्रीची हेरिटेज टूर 70 डिजिटल स्क्रीनच्या माध्यातून घडविण्यात येणार आहे. गुगल आर्टस् ऍण्ड कल्चरल यांच्याशी रेल हेरिटेज डिजिटायझेशन प्रोजेक्ट ऑफ इंडियन रेल्वेने नुकत्याच केलेल्या करारानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नुकतेच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे प्रथमच देशाचा रेल्वेचा हेरिटेज खजाना देशी आणि विदेशी पर्यटकांना पाहावयास मिळणार आहे. हिंदुस्थानी रेल्वेने देशाचा कशाप्रकारे विकास केला आणि वाहतूक यंत्रणेत क्रांती घडविली याचे दर्शन रेल्वे स्थानकांवर डिजिटल स्क्रीनवर होणार आहे. आपली महान संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांच्यामध्ये रेल्वेचे योगदान कशाप्रकारे आहे हे समजणे या प्रकल्पामुळे शक्य होणार असल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.


























































