लेख – मराठी ज्ञानभाषा कधी होणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप देशपांडे

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असला तरी ती ज्ञानभाषा कशी होईल आणि टिकून राहील याचा विचार महत्त्वाचा आहे आणि ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. कारण वाचण्यातून, लिहिण्यातून, बोलण्यातून आणि दैनंदिन व्यवहारातून हे शक्य आहे.नुसत्याच गप्पा करून आणि संमेलनातून शक्य नाही. संमेलन होत राहतील, पुस्तक महोत्सव होत राहतील. त्यातून सगळेच साध्य होत नाही हा नेहमीचाच अनुभव आहे. आता मराठी भाषा गौरव दिन आणि त्याच वेळेला विश्व मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने राज्य सरकारने योग्य तो विचार करावा ही अपेक्षा आहे.

मराठी भाषा गौरव दिनाच्या उद्देशांपैकी महत्त्वाचा उद्देश शिक्षणात मराठीचा वापर वाढविणे, मराठी भाषेचे महत्त्व, मराठी साहित्य आणि भाषेचा गौरव करणे, तिच्या संवर्धनासाठी जे जे प्रयत्न आवश्यक आहेत ते करणे, विकासासाठी चालना देणे ही आहेत. 27 फेब्रुवारी हा मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त वि.वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करत असतो.

1 मे  रोजी साजरा होणारा ‘मराठी राजभाषा दिन’, 21 फेब्रुवारी रोजी साजरा होणारा ‘जागतिक मातृभाषा दिन’ आणि 27 फेब्रुवारी रोजी  साजरा करण्यात येत असलेला ‘मराठी भाषा गौरव दिन’ हे तीनही वेगवेगळे दिन विशेष आहेत आणि हा फरक समजून घ्यायला हवा.

महाराष्ट्रात तसेच देशभरात ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसांचा रहिवास आहे. मराठी मंडळे, महाराष्ट्र मंडळे आहेत त्या त्या ठिकाणीही मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. अनेक प्रकाशक आपल्या पुस्तकांवर यानिमित्ताने सवलती जाहीर करून पुस्तक विक्री करीत असतात. आपण हा दिवस साजरा करतो, परंतु हा दिवस फक्त साहित्य केंद्रित झाला आहे असा एक विचार मांडला जातो, बऱ्याच अंशी तो खरा आहे. कारण साहित्य हा भाषेचा भाग आहे.  आपण त्या दिवशी फक्त कथाकथन, कविता वाचन, पुस्तक परिचय अशाच कार्यक्रमांतून समोर जात असतो. भाषेच्या संवर्धनासाठी काय करणे आवश्यक आहे आणि काय करावे याचा विचार मात्र कुठे होत नाही असे दिसते. थोडक्यात  असे दिवस हे फक्त आता इव्हेंट म्हणून साजरे होतात.

महाराष्ट्रात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी दरवर्षी 1 ते 15 जानेवारी काळात ‘वाचन पंधरवाडा’ (वाचन संकल्प महाराष्ट्राचा) राबवला जातो. यामध्ये शालेय व महाविद्यालयीन स्तरावर सामूहिक वाचन, पुस्तक प्रदर्शन आणि वाचन कट्टा यांसारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी हा हेतू असतो. हा पंधरवडा केवळ एक कार्यक्रम नसून त्या माध्यमातून एक चळवळ उभी राहावी हा उद्देश आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठी भाषेचे संवर्धन, जतन आणि प्रसार करण्यासाठी दरवर्षी 14 ते 28 जानेवारी हा कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’  म्हणून साजरा केला जातो या कालावधीत निबंध स्पर्धा, काव्य वाचन, शुद्धलेखन कार्यशाळा व व्याख्याने यांसारख्या विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करून मराठी भाषेचा वापर वाढवण्यावर भर दिला जातो.

मराठी भाषेला पंधराशे वर्षांची परंपरा आहे. जगभरात मोठय़ा भाषिकांचे बोलणाऱ्यांचे समूह आहेत त्यात मराठीचा पंधरावा नंबर लागतो तर नऊ कोटी माणसांची मातृभाषा मराठी आहे. अर्थात असे असले तरी मी स्वतः मराठी असून मराठीला किती न्याय देतोय, हेही तपासणे गरजेचे आहे. खरं म्हणजे आता आपल्यालाच मराठीचा विसर पडत चाललाय. अनेक ठिकाणी मराठी शाळा बंद पडत असल्याचे दिसते. काही ठिकाणी विद्यार्थी आहे तर शिक्षक नसतात, शिक्षक आहे तर विद्यार्थी नाही. अनेक ठिकाणी शाळा इमारतीची पडझड झाली आहे. महाराष्ट्रात मराठी शाळा टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात हीच मोठी शोकांतिका आहे. मराठी शाळेतच दर्जेदार शिक्षण आणि सर्व सुविधा पुरवा. त्या का नाही पुरवीत? इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी जिल्हा परिषदेच्या किंवा महापालिकेच्या सरकारी प्राथमिक शाळांना सुरुंग लावला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही

आज ग्रामीण भागातील मराठी शाळांची  काय दशा आहे हे आपण बघतोच आहे. जो तो आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम शाळांमध्ये टाकण्यासाठी आग्रही आहे. लाखाच्या वर पैसे भरून प्रवेश मिळवतात.  मराठी शाळा बंद पडताहेत.  प्राथमिक शिक्षण हाच मराठीच्या संवर्धनाचा पाया आहे. कारण याच वयात शिक्षण आणि संस्कार या गोष्टी मुलांवर होणे आवश्यक असते, परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे आकर्षण मुलांबरोबर पालकांतही मोठय़ा प्रमाणात आढळून येते आणि त्यामुळे ज्याला आपण मराठीचा पाया म्हणतो त्या प्राथमिक शाळा बंद होण्याचे अवस्थेत आहेत. एकूणच सरकारी प्राथमिक शाळेची अवस्था अतिशय वाईट  झाली आहे. त्या शाळा बंद करणे हा एकमेव मार्ग नसून त्यात सुधारणा घडवून आणणे हे तितकेच महत्त्वाचे आहे हा विचार करायला हवा आहे.

मराठी शाळांची परिस्थिती चिंताजनक असून इंग्रजी माध्यमाचे आकर्षण, मराठी माध्यमातून शिकण्याला कमी लेखले जाणे ही प्रमुख आव्हाने आहेत. शहरी आणि निमशहरी भागांत पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे कल वाढल्याने मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. मराठी शाळांचे शिक्षकसुद्धा आपल्या मुलांना सरकारी मराठी शाळांमध्ये न घालता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतात. ते स्वतःच्या शाळेत शिक्षण देतात तर त्यांचा त्यांच्या शिकवण्यावर भरवसा नाही का?

अनेक सरकारी मराठी शाळांमध्ये चांगले वातावरण असते, नाही असे नाही, पण अशा काही शाळांच्या शिक्षकांच्या गैरवर्तवणुकीने इतर मराठी शाळाही बदनाम होत आहेत. आजच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या युगात मराठी शाळांनी दर्जेदार शिक्षण देण्याची गरज आहे. व्यवहारात आणि शिक्षणात मराठीचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे. हाच विचार एका साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या वेळी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी त्यांच्या भाषणात प्रामुख्याने मांडला होता.

निरनिराळ्या कार्यालयांत कार्यालयीन कामकाज मराठीत व्हावे म्हणून शासनाने निर्णय घेतला आहे, सक्तीचे केले आहे, पण त्यातही प्रगती नाही.संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच ठिकाणच्या पाटय़ा मराठीतच हव्यात हा आग्रह धरला पाहिजे. फक्त पाटय़ा मराठीत करून भागणार नाही. महाराष्ट्रात रहिवास करावयाचा त्या प्रत्येकाला मराठी भाषा अवगत असावी. त्यासाठी काहीतरी धोरण असावे.

कोणत्याही भाषेचे संगोपन होण्यासाठी तिचा वापर ज्ञानभाषा म्हणून ज्ञान संवर्धनासाठी होणे आवश्यक आहे. ज्ञानावर आधारित सर्व क्षेत्रांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी मराठी ही ज्ञानभाषा करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  वर्धा येथील साहित्य संमेलनात बोलले होते. पुढे काय झाले? सगळेच मराठी भाषा संवर्धनाविषयी विचार मांडतात. ही जबाबदारी आता दोन्ही पातळीवर होणे आवश्यक आहे. शासनाने त्याच्या बाजूला शक्य आहे ते ते करायला हवे आणि मराठी माणसानेही आपापल्या पातळीवर मराठी भाषा-संस्कृतीसाठी शक्य ते सगळे करायला हवे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असला तरी ती ज्ञानभाषा कशी होईल आणि टिकून राहील याचा विचार महत्त्वाचा आहे आणि ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. कारण वाचण्यातून, लिहिण्यातून, बोलण्यातून आणि दैनंदिन व्यवहारातून हे शक्य आहे.नुसत्याच गप्पा करून आणि संमेलनातून शक्य नाही. संमेलन होत राहतील, पुस्तक महोत्सव होत राहतील. त्यातून सगळेच साध्य होत नाही हा नेहमीचाच अनुभव आहे. आता मराठी भाषा गौरव दिन आणि त्याच वेळेला विश्व मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने राज्य सरकारने योग्य तो विचार करावा ही अपेक्षा आहे.