रत्नागिरी : 42 चिमुकल्यांना कोरोनामुक्त करणाऱ्या प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञाचे कोरोनामुळे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यात कोविड रूग्णालयात सेवा बजावताना 42 चिमुकल्यांना कोरोनामुक्त करणारे डॉक्टर दिलीप मोरे यांचे कोरोनामुळे गुरूवारी पहाटे अडीच वाजता जिल्हा कोविड रूग्णालयात मृत्यू झाला.मृत्यू समयी ते 64 वर्षांचे होते. बाळांना कोरोनामुक्त करत जीवदान देणाऱ्या या प्रसिद्ध बालरोगजतज्ज्ञाचे कोरोनानेच निधन झाल्याच्या वृत्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील अनेकांना धक्का बसला आहे.

बालरोगतज्ज्ञ डॉ.दिलीप मोरे गरीबांचे डॉक्टर म्हणून परिचित होते.जिल्हा शासकीय रूग्णालयात त्यांनी बालरोगतज्ञ म्हणून अनेक वर्ष सेवा बजावली. सेवानिवृत्तीनंतरही ते जिल्हा रूग्णालयात सेवा बजावत होते.त्याचबरोबर रत्नागिरीतील एस.टी.स्टॅंड परिसरात ते दवाखाना चालवत होते.

कोरोनाची साथ पसरताच रत्नागिरीत लहान मुलांनाही कोरोनाची लागण होऊ लागली.जन्मलेल्या चार दिवसांच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली होती.अशा बालकांवर डॉ.दिलीप मोरे जिल्हा रूग्णालयात सेवा बजावत होते. साठी पार केलेली असतानाही ते रूग्णालयात येत होते.  लहान मुलांना पहायला कुणी डॉक्टर नसला तर? हा विचार करून ते सेवा बजावत होते.

जिल्हा रूग्णालयात दाखल झालेल्या 42 बालकांना त्यांनी कोरोनामुक्त केले.ही सेवा बजावत असताना कोरोनाने त्यांना गाठलं.गेले आठ दिवस त्यांच्यावर जिल्हा कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची कोरोनाशी सुरू असलेली झुंज आज पहाटे अडीच वाजता संपली.