
>> दिलीप ठाकूर
चित्रपट हे दृश्य माध्यम आणि त्यात छायाचित्रणकाराची दृष्टी व भूमिका खूपच महत्त्वाची. आज डिजिटल क्रांती झाली असली तरी चित्रपटाच्या आशयविषयानुसार त्याची चित्रीकरण स्थळे आणि त्यावरचे लायटिंग, कॅमेऱयाची भाषा अशा अनेक गोष्टींना खूप महत्त्व आहे आणि हे सगळे ज्ञात असलेल्या आणि कायमच नवीन गोष्टी शिकण्यास उत्सुक असलेल्या चित्रपट छायाचित्रणकार गुरुराज जोईस याचे निधन झाले. जोईस याची चित्रपट छायाचित्रणकार म्हणून कारकीर्द अवघी पंचवीस वर्षांची. अशातच त्याचे निधन व्हावे हे दुःखदायक आहे. मूळचा तो कर्नाटकातील शिमोगा येथील. लहानपणापासून क्रिकेटप्रेमी.
चित्रपटाचेही वेड होतेच आणि चित्रपट पाहत असतानाच ‘अमुक अमुक दृश्य कशा पद्धतीने चित्रीत करण्यात आले असेल’ याबाबत त्याला विशेष उत्सुकता असे. कालांतराने त्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम छायाचित्रणकार अनिल मेहता यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. इनडोअर आणि आऊट शूटिंग यातील फरक, थीमनुसार सेटची झालेली उभारणी आणि त्यातील कॅमेरा वर्क, सेटवरचे वातावरण, नवीन तंत्रज्ञानाचे कॅमेरे अशा अनेक गोष्टीत त्याने रस घेतला, तो शिकत राहिला. त्यातून त्याचा दृष्टिकोन अधिकाधिक प्रमाणात आकार घेत गेला. अनिल मेहताकडे ‘अग्निवर्षा’, ‘साथिया’ या चित्रपटांच्या वेळेस तो सहाय्यक होता. आमिर खान प्रॉडक्शन्सचा आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’चा (2001) कॅनव्हास खूपच मोठा होता. हा दीडशे पावणेदोनशे वर्षांपूर्वीच्या गुजरातमधील एका खेडय़ातील खेडूत क्रिकेट शिकून इंग्रजांना क्रिकेट सामन्यात पराभूत करून पैजेनुसार आपला शेतसारा (लगान) माफ करून घेतात अशी गोष्ट. बरेचसे शूटिंग भूजमधील दूरवरच्या ग्रामीण भागात. युनिट खूपच मोठे आणि ‘कॅमेरा’ तर या सगळ्याचा मूड व्यवस्थित पकडणारा हवा. अशोक मेहता या चित्रपटाचा छायाचित्रणकार. आणि त्याची मोठी टीम सक्रिय. रिटेकवर रिटेक ठरलेले आणि त्यात सहाय्यक छायाचित्रणकार गुरुराज जोईस होते. हे एक दीर्घकालीन चित्रीकरण सत्र असल्याने त्यांना अनेक लहानमोठय़ा गोष्टी शिकायला मिळाल्या. तसेच रोजचे चित्रीकरण संपल्यावर अनेकांशी संवाद होई. या चित्रपटाच्या वेळी अपूर्व लखिया हा आशुतोष गोवारीकरच्या दिग्दर्शन टीममध्ये होता. तो चित्रपट दिग्दर्शन शिकत होता, तर गुरुराज जोईस छायाचित्रण शिकत होता. दोघे जवळपास सारख्याच वयोगटातील आणि स्वतंत्रपणे पाऊल टाकण्याचे स्वप्न पाहणारे. दोघांची मैत्री झाली आणि अपूर्व लखियाने स्वतंत्रपणे काम सुरू केल्यावर गुरुराज जोईसही स्वतंत्रपणे छायाचित्रणकार म्हणून काम करू लागला आणि मग गुरुराज जोईसने ‘मुंबई से आया मेरा दोस्त’, ‘शूटआऊट लोखंडवाला’, ‘मिशन इस्तंबूल’, ‘एक अजनबी’, मूळ ‘जंजीर’ची त्याच नावाने करण्यात आलेली रिमेक, ‘गली गली चोर है’ हे हिंदी चित्रपट तसेच ‘तुफान’ हा तेलुगू चित्रपट केला. छायाचित्रणकार म्हणून गुरुराज जोईसची ही अशी यशस्वी वाटचाल सुरू होती. चित्रपटाचे तंत्र कमालीचे विकसित झाले असले तरी त्यात तो चित्रपट हरवून जाऊ नये, आवश्यक अशीच लायटिंग असावी, गरजेनुसार ट्रॉली वापरावी ही त्याची कार्यशैली होती. छायाचित्रणकार म्हणून त्याची उत्तम वाटचाल सुरू असतानाच त्याचा अकाली मृत्यू व्हावा हे दुर्दैवीच!


























































