
नेपियन सी रोड येथे राहणाऱया 61 वर्षीय हिरे व्यापाऱयाने आज सकाळी 15 व्या मजल्यावरील गच्चीतून उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली. धीरेनभाई शहा असे त्या व्यापाऱयाचे नाव होते. त्यांनी आत्महत्या का केली त्याचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
नेहमीप्रमाणे आज सकाळी 9 च्या सुमारास धीरेनभाई त्यांच्या ऑपेरा हाऊस येथील प्रसाद चेंबर या इमारतीच्या 15 व्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात आले. तेथे देवांची पूजाअर्चा केल्यानंतर त्यांनी मोबाईल गच्चीच्या कठडय़ावर ठेवून खाली उडी टाकली. 15 व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे शहा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पॅण्टच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात मी आत्महत्या करीत असून त्याला कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहून ठेवले होते. त्यामुळे शहा यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
























































