मोतीलाल नगरमधील रहिवाशांचे थेट पुनर्वसन होणार, म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचे आश्वासन

गोरेगावच्या मोतीलाल नगरच्या रहिवाशांचे पुनर्वसन थेट केले जाईल. पुणालाही ट्रान्झिट पॅम्पमध्ये पाठवण्याची गरज नाही. रहिवाशांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प मार्गी लावू, असे आश्वासन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले आहे.

मोतीलाल नगरच्या पुनर्विकासप्रकरणी हायकोर्टाने दिलेल्या निकालानुसार म्हाडा उपाध्यक्षांना जबाबदार धरण्यात आले आहे. मोतीलाल नगरचा पुनर्विकास करताना कायदा आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. रहिवाशांचे थेट पुनर्वसन केले जाईल. येथे बुलडोझर कारवाई करणार नाही. या विकासात रहिवाशांच्या हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी आम्ही दक्ष आहोत, असेही जयस्वाल म्हणाले. या शिष्टमंडळात मोतीलाल नगर विकास समितीचे अध्यक्ष युवराज मोहिते यांच्यासह किरण निरभवणे, तरसेमसिंग सोहल, लक्ष्मी शिंदे, मिलिंद अडांगळे, गौतम कांबळे, अलीम खान, अमित काकडे आदी रहिवासी सहभागी होते.

n मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाबाबत हायकोर्टाच्या निर्णयानंतर लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मोतीलाल नगर विकास समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच म्हाडा उपाध्यक्षांची भेट घेतली. मोतीलाल नगरमध्ये म्हाडा बुलडोझर चालवणार आहे का, याबाबत प्राधिकरणाने स्पष्टीकरण द्यावे, मोतीलाल नगरमध्ये सर्व्हे कोण आणि कसे करत आहे, पुनर्विकासाबाबत पुढील धोरण काय, पुनर्विकासाचा आराखडा लोकांपुढे ठेवावा अशा मागण्यांचे निवेदन समितीच्या वतीने उपाध्यक्षांना देण्यात आले.

रहिवाशांच्या मागण्यांचे निवेदन सरकारला पाठवणार

पुनर्वसन प्रक्रियेसाठी मोतीलाल नगरमध्ये होणारे सर्वेक्षण वगैरे गोष्टींबाबत लोकांना आधी माहिती दिली जाईल. रहिवाशांची दोन हजार कार्पेट चौरस फुटाची मागणी तसेच काॅर्पस फंड, पार्किंग आदी मागण्यांचे निवेदन राज्य सरकारकडे पाठवू, असेही उपाध्यक्षांनी शिष्टमंडळाला सांगितले.